Tulsi Gabbard : डॉनल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांना केले अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका !

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व हिंदु खासदार तुलसी गबार्ड

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (प्रेसिडेंट-इलेक्ट) डॉनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या पहिल्या हिंदु खासदार तुलसी गबार्ड यांची राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी नियुक्ती केली. ट्रम्प यांनी  तुलसी यांचे ‘अभिमानास्पद रिपब्लिकन’ म्हणून वर्णन केले. ‘तुलसी गबार्ड या त्यांच्या निर्भिड स्वभावाला गुप्तचर विभागामध्येही आणतील. डेमक्रॅटिक पक्षाकडून माजी अध्यक्षपदाच्या दावेदार असल्याने तुलसी गबार्ड यांना दोन्ही पक्षांमध्ये पाठिंबा मिळतो. मला आशा आहे की, त्यांचा आम्हाला अभिमान वाटेल’, असेही ते म्हणाले.

कोण आहेत तुलसी गबार्ड ?

तुलसी गबार्ड यांनी जवळपास २ दशके ‘नॅशनल गार्ड’ या अमेरिकी सैन्याच्या शाखेत काम केले आहे. तुलसी यांना इराक आणि कुवेत येथे तैनात करण्यात आले होते. गुप्तचर विभागात काम करण्याचा अनुभव नसला, तरी त्यांनी होमलँड सुरक्षा समितीवरही काम केले आहे. तुलसी वर्ष २०१३ ते २०२१ या कालावधीत हवाई बेटसमूहांच्या खासदार होत्या. त्या आधी डेमक्रॅटिक पक्षात होत्या; पण नंतर रिपब्लिकन पक्षाचा भाग बनल्या.

तुलसी यांचा भारताशी कोणताही संबंध नाही; परंतु त्यांच्या आईने हिंदु धर्म स्वीकारला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांचे नावही हिंदु धर्मानुसार ठेवले. तुलसी गबार्ड यांचाही हिंदु धर्मावर विश्‍वास आहे. त्यांनी संसदेत श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. तसेच त्या अनेक वेळा हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांसंदर्भात आवाज उठवत आल्या आहेत.