पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी मार्को रुबिओ यांची अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणून निवड केली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; कारण मार्को भारतसमर्थक आणि पाकिस्तानविरोधी आहेत.
अमेरिकेवरील भारताची पकड वाढेल आणि पाकिस्तानची स्थिती कमकुवत होईल ! – पाकिस्तानी तज्ञ कमर चीमा
मार्को यांच्या संदर्भात पाकिस्तानमधील राजकीय तज्ञ कमर चीमा यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मार्को स्पष्टपणे भारताचे समर्थक आणि पाकिस्तानचे विरोधक राहिले आहेत. मार्को केवळ या वक्तव्यांपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांनी यापूर्वीही असे प्रस्ताव आणले आहेत, जे पाकिस्तानच्या विरोधात आणि भारताच्या बाजूने होते. यातून हे दिसून येते की, आगामी काळात अमेरिकेवरील भारताची पकड वाढेल आणि पाकिस्तानची स्थिती कमकुवत होईल. पाकिस्तानसाठी भविष्य कठीण आहे. मार्को केवळ पाकिस्तानच नव्हे, तर चीनच्या विरोधातही राहिले आहेत. ते हमास आणि गाझा यांच्या विरोधातही आक्रमक आहेत अन् इस्रायलला विनाअट पाठिंबा देतात. पाकिस्तानसाठी हे कठीण आहे. केवळ मार्कोच नव्हे, तर ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्ज हेदेखील पाकिस्तानविरोधक राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानकडे काय पर्याय आहेत ?
कमर चीमा यांनी इम्रान खान यांचे सरकार कोसळले, तेव्हा घडलेल्या घटनांचाही संदर्भ दिला. अमेरिका त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला होता. चीमा म्हणाले की, ट्रम्प प्रशासनाच्या वृत्तीवरून हे दिसून येते की, पाकिस्तानकडे आता सौदी अरेबियामध्ये जाण्याचाच पर्याय उरला आहे. पाकिस्तानचे नेतृत्व कदाचित् तणावग्रस्त असेल; परंतु पाकिस्तान सरकार काही मार्ग शोधण्यात यशस्वी होत आहे आणि ते तसे करत राहू शकते.