|
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डॉनल्ड ट्रम्प त्यांचे सरकार चालवण्यासाठी मंत्र्यांची नेमणूक करत आहेत. प्रसिद्ध अब्जाधीश इलॉन मस्क आणि भारतीय वंशाचे उद्योगपती विवेक रामास्वामी यांना सरकारच्या कार्यक्षमतेच्या विभागाचे (डीओजीई – ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’चे) प्रमुख करण्यात आले आहे. हा नवीन विभाग आहे. हा विभाग सरकारला विविध विषयांवर धोरणात्मक सल्ले देणार आहे. ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’चे पत्रकार पीट हेगसेथ यांनाही त्यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. त्यांना संरक्षणमंत्री करण्यात आले आहे.
Trump’s Cabinet Takes Shape!
Elon Musk & Vivek Ramaswamy to lead the Department of Government Efficiency!
Pete Hegseth a well-known Fox News personality nominated as Secretary of Defence!#DOGE #Trump2024pic.twitter.com/5G7ZBsbm3r
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 13, 2024
१. या संदर्भात ट्रम्प म्हणाले की, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की, मस्क आणि रामस्वामी हे दोघे अद्भुत अमेरिकन्स माझ्या प्रशासनासाठी नोकरशाही अल्प करण्यासाठी, अनावश्यक नियम काढून टाकण्यासाठी आणि केंद्रीय यंत्रणा यांची पुनर्रचना करण्यासाठी कार्य करतील. आमच्या ‘सेव्ह (सुरक्षित) अमेरिका’ धोरणासाठी हे आवश्यक आहे. या नवीन प्रणालीमुळे सरकारी पैशांची उधळपट्टी करणार्या लोकांमध्ये दहशत निर्माण होईल.
२. इलॉन मस्क म्हणाले की, ‘सरकार या नवीन विभागाद्वारे २ ट्रिलियन डॉलर्स (१६८ लाख कोटी रुपये) वाचवेल.’ काही तज्ञांच्या मते हे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. संरक्षण किंवा सामाजिक सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये कपात केली, तरच मस्क हे करू शकतील.
भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी
विवेक रामास्वामी हे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत. त्यांचे स्वतःचे फार्मस्युटिकल आस्थापन आहे. ते स्वतः रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. नंतर त्यांनी माघार घेत ट्रम्प यांना पाठिंबा घोषित केला होता.
आगामी संरक्षणमंत्री हेगसेथ यांनी सैन्यात दिली आहे सेवा !
ट्रम्प यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त केलेले पीट हेगसेथ यांनी सैन्यात सेवा दिली आहे. इराक आणि अफगाणिस्तान येथे अमेरिकेचा सैनिक म्हणून काम केले आहे. ट्रम्प म्हणाले की, पीट यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी योद्धा म्हणून घालवले आहे. ते कणखर, हुशार आणि ‘अमेरिका फर्स्ट’ या धोरणावर विश्वास ठेवतात.