मठ, मंदिर आणि धार्मिक परिसरातील पत्ते, जुगार यांसारख्या अनैतिक व्यवसायांवर कारवाई करा !

‘प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळा’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन !

प्रतिकात्मक छायाचित्र

अहिल्यानगर – शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील विविध मंदिरे अन् परिसरामध्ये स्थानिक लोकांकडून पत्ते, जुगार खेळण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग होत असून अशा प्रकाराला पोलीस प्रशासनाने त्वरित आळा घालावा आणि जुगार खेळणार्‍यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन ‘प्राचीन संस्कृती संवर्धन मंडळा’च्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी या जुगाराला विरोध केला असता त्यांचे कुणी ऐकत नाही. अशा परिस्थितीत लहान मुली, महिला यांना मंदिरात दर्शनासाठी जाण्यास अडचण येते. मुले मंदिरात दर्शनासाठी गेली असता असे प्रकार पाहून त्यांच्या मनावर ‘मंदिरात जुगार खेळला जातो’, असा समज होऊ शकतो. शासनाने तंटामुक्त अभियान सर्वत्र राबवले असून अशा घटनेमुळे गावातील तंटा अधिक वाढू शकते. याचसमवेत मंदिरांमध्ये काही धार्मिक कार्यक्रम असतात, अशा वेळी या जुगार खेळणार्‍या मंडळींकडून अडचण येते. सर्व घटनांचा विचार करता प्रशासनाने त्वरित पावले उचलून मंदिर आणि परिसरात जुगार खेळणार्‍यांवर तात्काळ कारवाई करून अशा घटना परत होणार नाहीत, याची नोंद घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी निवेदन देतांना ‘प्राचीन संस्कृती मंडळा’चे अध्यक्ष बापू ठाणगे, सदस्य अजय गायकवाड, विशाल शितोळे, पत्रकार संजय जोशी, अधिवक्ता अभिषेक भगत उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. असे निवेदन पोलिसांना का द्यावे लागते ?