महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
शिराळा (जिल्हा सांगली) : आता जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत कलम ३७० पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ३७० कमल हटवणे आवश्यक असल्यानेच आम्ही ते हटवले. विरोधी पक्षांच्या ‘इंडी’ आघाडीच्या ४ पिढ्या आल्या, तरी आम्ही जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम मागे घेणार नाही. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असून त्यांच्या नेतृत्वात भारत जगातील शक्तीशाली देश बनला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर केंद्रातील सरकारच्या साहाय्याने महाराष्ट्राला एक क्रमांकाचे राज्य बनवले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. ते शिराळा येथे भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.
१. पंतप्रधान मोदी यांनी ससदेत ‘वक्फ’ सुधारणा विधेयक आणले आहे. यालाही ‘इंडी’ आघाडीचा विरोध आहे. काँग्रेस सरकारने लांगूलचालनाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कर्नाटक सरकारने अनेक गावे मंदिरांसह ‘वक्फ बोर्डा’ची संपत्ती म्हणून घोषित केली आहेत. महाराष्ट्रात जर आघाडीचे सरकार आले, तर शेतकर्यांची भूमी ‘वक्फ’च्या नावावर करतील. ‘वक्फ’विषयी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका घोषित करावी. ‘वक्फ’ला त्यांचे समर्थन आहे का ?, हे त्यांनी सांगितले पाहिजे.
बत्तीस शिराळा येथील नागपूजा चालू करू !महाविकास आघाडी सरकारने बत्तीस शिराळा येथील नागपूजा बंद केली; मात्र आमचे सरकार आल्यावर ती विधीवत् चालू करू ! |
२. भाजप सरकारने ‘औरंगाबाद’चे नाव ‘संभाजीनगर’ केले; मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांचा संभाजीनगर नावाला विरोध आहे. यापुढील काळातही हे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ असेच राहील, ते आता कुणीही पालटू शकणार नाही.
३. राज्यात आघाडीचे सरकार असतांना शरद पवार यांनी काय केले ? याउलट पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी सर्वाधिक निधी दिला. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उभारले. १० लाख लोक ‘आयुष्मान भारत’ योजनेचा लाभ घेत आहेत, तर ७ लाख महिलांना ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळत आहे.
४. सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांचे सरकार असतांना प्रतिदिन आतंकवादी आक्रमण होत होते. आमचे सरकार असतांना पुलवामा आक्रमण झाल्यावर पाकिस्तानात घुसून केवळ १० दिवसांत ‘एअर स्ट्राईक’ केले. महाविकास आघाडीतील पक्ष देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत.
महाराष्ट्र ही पवित्र भूमी असून समर्थ रामदासस्वामी यांचे पाऊल जिथे पडले, ती ही पवित्र भूमी आहे. रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य रक्षणाच्या लढाईत पाठिंबा देण्याचे काम केले. महाराष्ट्र ही वीरभूमी असून ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आहे. |