परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय केले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन येथे पाहूया.
महत्त्वपूर्ण सूत्रे
१. प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण आ करून, म्हणजे स्वतःचे तोंड उघडे ठेवून श्वास घेतला, तर घशाला पुष्कळ कोरड पडते. पू. दातेआजी किती दिवस असा श्वास घेत आहेत ! हे आश्चर्य आहे.’’
२. ‘पू. आजींच्या अनाहतचक्रावर उपाय करतांना त्या त्यांच्या डाव्या हाताने आपला हात ढकलतात, असे का होते ?’ याविषयी प.पू. डॉक्टरांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘पू. आजींवर उपाय होत असल्याने त्यांना आध्यात्मिक त्रास होतो. त्यामुळे पू. आजी त्यांच्या हाताने उपायांना विरोध (ब्लॉक) करण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरु गाडगीळकाका म्हणाले, ‘‘आपण नेमकेपणाने आणि अचूक उपाय करत आहोत. त्यामुळे पू. आजींना जाणीव होऊन त्रास होत आहेत. आपण उपाय करत आहोत, त्याचा परिणाम किंवा लाभ पू. आजींना होऊ नये; म्हणून वाईट शक्तीही कार्यरत असतात. त्या पू. आजींचा हात बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतात; परंतु पू. आजींच्या संदर्भात त्रासाचे कारण अधिक आहे.’’
संतांच्या वाढीव आयुष्याचे काय होते ?
१. प्रश्न : पू. दातेआजी यांचा मृत्यूयोग पुढे ढकलला गेला. त्या संत आहेत, तर त्यांचे देवाण- घेवाण हिशोब आणि प्रारब्ध संपले आहे. त्यांना पुढचे आयुष्य नाही, तर या वाढीव आयुष्याचे कसे असते ?
प.पू. डॉक्टर : देवाने पू. दातेआजींचे आयुष्य साधनेसाठीच वाढवले. त्यांचा नामजप होत रहातो.
२. प्रश्न : जे आयुष्य वाढवलेले असते, ते पुढच्या जन्मात येते असे नसते ना ?
प.पू. डॉक्टर : नाही.
जपानुसार प्राणशक्ती वाढते का ?
३. प्रश्न : सर्वसामान्यतः आपण वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी उपाय करतो. इथे मुळात वयोमानानुसार प्राणशक्ती न्यून होत चालली आहे. मग आता जपानुसार प्राणशक्ती वाढत जाते का ? म्हणजे तो त्रास उणावतो का ?
प.पू. डॉक्टर : वाईट शक्ती आणि प्रारब्ध हे २ वेगळे भाग आहेत. वाईट शक्ती एकदम आक्रमण करत असतात. पू. दातेआजी यांच्या प्रारब्धात या वयाला साधना लिहिलेली आहे; म्हणून सगळे उपाय होत आहेत. त्यांचा नामजपही अधून-मधून चालू असतो, तो पुढे आणखीन होईल.
४. प्रश्न : त्या जपाने त्यांची प्राणशक्ती अजून वाढून, ती प्रवाहित होऊन ते चैतन्य सगळीकडे पोचते का ? आपण जो जप देतो, त्या त्या ठिकाणची प्राणशक्ती वाढते, असे होते का ?
प.पू. डॉक्टर : हो असेच असते.’
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२४)
|