किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर करण्याठी देवस्थान समितीचे महापालिकेला पत्र !
कोल्हापूर, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीच्या किरणोत्सवास ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत असून तो ११ नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्या पार्श्वभूमीवर ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने किरणोत्सवाच्या मार्गातील अडथळ्यांची पहाणी करण्यात आली. किरणोत्सवाच्या मार्गात मिळकतदार आणि व्यापारी यांनी केलेल्या बांधकामाचे ६ अडथळे असून त्यासाठी समितीच्या वतीने महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. (असे पत्र का द्यावे लागते ? – संपादक)
हा किरणोत्सव वर्षातून २ वेळा म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन यांमध्ये होतो. उत्तरायणात तो ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारीला, तर दक्षिणायनात तो ९, १० आणि ११ नोव्हेंबरला होतो. सोहळ्याच्या वेळी मावळतीचे सूर्यकिरण महाद्वारातून मंदिरात प्रवेश करून प्रथम दिवशी देवीचे चरण, दुसर्या दिवशी पोट आणि तिसर्या दिवशी मुख अन् तदनंतर संपूर्ण मूर्ती यांना स्पर्श करतात. सूर्यकिरणांनी देवीच्या मूर्तीला स्पर्श करण्याआधी विद्युत् दीप मालवून गाभार्यात २ समया तेवत ठेवल्या जातात. किरणोत्सवानंतर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो.