सूर्य सत्याच्या आधारावर आणि सत्य हे ब्रह्माचेच पर्यायी नाव !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : कस्मिंश्च (आदित्यः) प्रतितिष्ठति ?

अर्थ : सूर्य कशाच्या आधारावर रहातो ?

उत्तर : सत्ये ।

अर्थ : सत्याच्या.

सूर्याला सत्याचा आधार आहे. सत्य, म्हणजे अस्तित्व किंवा असणेपणा. जे त्रिकालाबाधित आहे, ज्यात अवस्था भेदाने कोणतेही परिवर्तन घडत नाही, जे नाश पावत नाही आणि जे सातत्याने जसेच्या तसे टिकून रहाते ते सत्य ! सत्य हे खरेतर ब्रह्माचेच पर्यायी नाम आहे. सूर्य सत्याच्या आधाराने रहातो, म्हणजे सूर्याचे सूर्यपण ब्रह्मावर अवलंबून आहे.

अद्वैत सिद्धांताप्रमाणे ब्रह्म हे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे जसे निमित्तकारण आहे; तसे उपादानकारणही आहे. सूर्य हा सृष्टीचाच एक भाग असल्याने अर्थातच ब्रह्म त्याचेही उपादानकारण आहे; म्हणून युधिष्ठिर उत्तर देतो, ‘‘सूर्य हा सत्य आणि ब्रह्म यांत प्रतिष्ठित आहे.’’

चित्राला भिंतीचा आणि डब्याला फळीचा आधार असतो, वक्ता व्यासपिठावर बसून बोलतो, त्या स्वरूपाचा आधार नाही. तरंगाला पाण्याचा, दागिन्याला सोन्याचा, घड्याला मातीचा आणि भासणार्‍या सापाला दोरीचा आधार असतो, तशा स्वरूपाचा हा आधार आहे. जे सापेक्ष आहे, त्याला सत्य म्हणता येणार नाही. व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या विशेषांमुळे सत्याचे होणारे ज्ञान सापेक्ष असू शकेल. मुळात सत्यालाच सापेक्ष म्हणणे, हे सत्य शब्दाचा अर्थच गमावण्यासारखे आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)