|
श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) एकदा म्हणाले, ‘ज्या दिवशी संत देह ठेवतात. त्या दिवशी आपण त्यांची पुण्यतिथी करतो. ही त्यांची खरी पुण्यतिथी नव्हे. ज्या दिवशी त्यांची देहबुद्धी मरते, त्याच दिवशी त्यांची खरी पुण्यतिथी असते. ती तिथी आपल्याला ठाऊक नसते; म्हणून त्यांच्या देहाच्या मृत्यूतिथीला आपण ‘पुण्यतिथी’ मानतो.’
ज्याची देहबुद्धी नष्ट झाली, त्याच्याच गळ्यात हार शोभतो !
श्रीमहाराज एकदा म्हणाले, ‘हार कुणाच्या गळ्यात शोभतो ? आपल्या गळ्यात फुलांचा हार आहे कि खेटरांची माळ आहे ? याचे भान ज्याला नाही, त्याच्याच गळ्यात हार खरा शोभतो. त्याच्यासाठी स्वतःचा देह मेलेलाच असतो.’
बहिर्मुख वृत्ती म्हणजे उलटी धरलेली दुर्बिण !
एका साधकाने प्रश्न केला , ‘परमार्थात गुरूंची आवश्यकता आहे का ?’ श्रीमहाराज म्हणाले, ‘होय, आहे; पण तो गुरु कोणता ? भगवंताच्या प्राप्तीच्या आड आपले आपणच येत असतो. सद्गुरु दुसरे तिसरे काही करत नसून तो तुमचे तुम्हालाच गुरु व्हायला शिकवतो. तो तुमच्याकडून नामस्मरण करून घेऊन तुमची वृत्ती अंतर्मुख करतो. विवेक सतत जागा ठेवून स्वतःच स्वतःचे दोष कसे पहावे, ते शिकवतो. दुर्बिण उलट धरली, तर जवळची वस्तू दूर आणि लहान दिसते. बहिर्मुखता, म्हणजे दुर्बिण उलट धरून बघण्यासारखे आहे. त्यामुळे खरा जवळ असलेला भगवंत फार लांब आणि आटोक्याबाहेरचा आहे, असे वाटते.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)