Notice to Wikipedia : केंद्र सरकारची विकिपीडियाला नोटीस

विकिपीडियावरून चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप

नवी देहली – भारत सरकारने ‘विकिपीडिया’ संकेतस्थळाला नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये गेल्या काही महिन्यांत त्याच्या विरोधात केलेल्या तक्रारी आणि पक्षपात यांचा उल्लेख आहे.

देहली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला फटकारले !

‘एशियन न्यूज इंटरनॅशनल’चे (ए.एन्.आय.चे) ‘विकिपीडिया’ संकेतस्थळावरील पृष्ठ (पेज) कुणीतरी संपादित केले आणि ‘हे सरकारचे प्रचाराचे साधन आहे’, असे लिहिले. तसेच विकिपीडियाच्या पानावर अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने संपादित करण्यात आल्या होत्या. या संदर्भात देहली उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. यावर सुनावणी करतांना देहली उच्च न्यायालयाने विकिपीडियाला फटकारले होते.

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्याचे विकिपीडिया पृष्ठ चुकीच्या पद्धतीने संपादित केले गेले असेल आणि विकिपीडिया आस्थापन त्याला समर्थन देत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. जर ते स्वत:ला मध्यस्थ म्हणवत असतील, तर तुम्हाला यात काय अडचण येत आहे ? जर काही चुकीचे संपादित केले गेले असेल, तर विकिपीडियाने अजिबात उभे राहू नये. ज्यांनी ए.एन्.आय.चे विकिपीडिया पृष्ठ चुकीच्या पद्धतीने संपादित केले आहे, त्यांची नावे घोषित करावीत.’ यावर विकिपीडियाने तसे करण्यास नकार दिला होता. सरकारने आता विकिपीडियाला नोटीस बजावल्यावर त्यात ‘विकिपीडियाला मध्यस्थ न मानता प्रकाशक का मानले जाऊ नये ?’, अशी विचारणा केली आहे.

साम्यवादी विचारसरणीच्या लोकांकडे आहे विकिपीडियाचे नियंत्रण !

विकिपीडियाचा प्रारंभ वर्ष २००१ मध्ये झाला. जिमी वेल्स आणि लॅरी सेंगर यांनी  त्याचा प्रारंभ केला. वर्ष २००३ मध्ये हिंदीतही हे संकेतस्थळ चालू करण्यात आले. प्रत्येक महिन्याला १७० कोटी लोक या संकेतस्थळावरील माहितीचा वापर करतात. या वापरकर्त्यांना सामग्री संपादित करण्याची सुविधा देखील मिळते, ज्यामुळे अनेक वेळा लोक येथे चुकीच्या गोष्टी संपादित करतात. या संकेतस्थळाचे नियंत्रण साम्यवादी विचारसरणीच्या लोकांकडे आहे. त्यामुळेच या संकेतस्थळावर अनेक वेळा भारत आणि हिंदु विरोधी मजकूर सापडतो.

संपादकीय भूमिका

विकिपीडिया हिंदु आणि भारत द्वेषी संकेतस्थळ आहे. यावर हिंदूंच्या संदर्भातील चुकीची माहिती प्रसारित केली जाते, तर चांगली माहिती गाळली जाते. त्यामुळे अशा संकेतस्थळांवर भारतात बंदीच घालणे योग्य ठरेल !