नईम यालाही ठार करण्याची इस्रायलची धमकी !
बेरूत (लेबनॉन) : इस्रायलच्या आक्रमणात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला ठार झाल्यानंतर ३२ दिवसांनी हिजबुल्लाने नवीन प्रमुखाची घोषणा केली आहे. हिजबुल्लाचा उपनेता नईम कासिम याच्याकडे संघटनेचे दायित्व सोपवण्यात आले आहे; मात्र यानंतर इस्रायलने नईम यालाही ठार करण्याची धमकी दिली आहे.
नसरूल्लाच्या मृत्यूनंतर कासिमनेच लेबनॉनच्या लोकांना संबोधित केले होते. कासिम हिजबुल्लाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. कासिम अनेक दशकांपासून बेरूतमध्ये धार्मिक शिक्षण देत आहे. नईम कासिम याच्या आधी नसरूल्लाचा चुलत भाऊ हाशेम सैफिद्दीन याचे नाव हिजबुल्लाचा प्रमुख बनण्याच्या शर्यतीत होते; मात्र इस्रायलच्या आक्रमणात तोही मारला गेला.