Heavy Rain Warning : १७ सप्‍टेंबर या दिवशी ७ राज्‍यांमध्‍ये अतीवृष्‍टीची चेतावणी

नवी देहली – हवामान विभागाने १७ सप्‍टेंबर या दिवशी मध्‍यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, कर्नाटक आणि केरळ या ७ राज्‍यांत अतीवृष्‍टीची चेतावणी दिली आहे. पूर्व मध्‍यप्रदेशात मुसळधार पावसाची (१२ सेमीपर्यंत) शक्‍यता आहे. उत्तरप्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि उत्तराखंड या राज्‍यांमध्‍येही मुसळधार पावसाची (७ सेमी) शक्‍यता आहे.

काही राज्‍यांतील पावसाची स्‍थिती

१. राजस्‍थान : राजस्‍थानच्‍या १५ जिल्‍ह्यांमध्‍ये मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्‍यात आली आहे.

२. मध्‍यप्रदेश : मध्‍यप्रदेशातील भोपाळ आणि जबलपूर यांसह ३८ जिल्‍ह्यांमध्‍ये अतीवृष्‍टीची चेतावणी देण्‍यात आली आहे.

३. उत्तरप्रदेश : राज्‍यात गेल्‍या ५ दिवसांपासून चालू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे शरयू, शारदा, गंगा आणि घाघरा या नद्यांना पूर आला आहे. वाराणसीमध्‍ये २५ सहस्र लोकांना पुराचा फटका बसला आहे. ८५ घाट गंगेत बुडाले आहेत. प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नद्यांना उधाण आले आहे. पाणी साचल्‍याने लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत आहेत. लखीमपूरमध्‍ये शारदा नदी धोक्‍याच्‍या चिन्‍हाच्‍या वरून वहात असल्‍याने १७० गावांमध्‍ये १ लाख लोक अडकले आहेत. गोंडा येथील घाघरा नदीत बुडून ३ जणांचा मृत्‍यू झाला. येथील २० गावांमध्‍ये पूर आला आहे.

४. हिमाचल प्रदेश : येथील पावसाळ्‍यात आतापर्यंत १७१ जणांचा मृत्‍यू तेथे २१ सप्‍टेंबरपर्यंत पावसाळा चालू रहाणार आहे. १८ सप्‍टेंबरला राज्‍यातील ६ जिल्‍ह्यांमध्‍ये विजांच्‍या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्‍याची चेतावणी देण्‍यात आली आहे. या पावसाळ्‍यात आतापर्यंत राज्‍यात पावसाशी संबंधित घटनांमध्‍ये १७१ जणांचा मृत्‍यू झाला आहे. ३० जण अद्याप बेपत्ता आहेत.

यंदा मान्‍सून नेहमीपेक्षा १६ दिवस अधिक सक्रीय रहाणार !

मान्‍सून  साधारणपणे १८ सप्‍टेंबरनंतर पश्‍चिम राजस्‍थानमधून माघार घेण्‍यास आरंभ करतो; परंतु यंदा तो आणखी १६ दिवस सक्रीय रहाण्‍याची शक्‍यता आहे. याचा अर्थ असा की, सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या अखेरपर्यंत देशात मुसळधार पावसाचा कालावधी असेल.

१८५ जिल्‍ह्यांमध्‍ये (२६ टक्‍के) दुष्‍काळी परिस्‍थिती !

हवामान खात्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार यंदा मान्‍सूनमध्‍ये सर्वत्रच अधिक पाऊस पडूनही देशातील अनुमाने एक चतुर्थांश, म्‍हणजेच १८५ जिल्‍ह्यांमध्‍ये (२६ टक्‍के) दुष्‍काळी परिस्‍थिती आहे.