Tajikistan Hijab Ban : मुसलमान देश ताजिकिस्‍तानमध्‍ये हिजाबवर देशव्‍यापी बंदी !

कट्टरतावादावर लगाम आणण्‍यासाठी उचलले कठोर पाऊल

(हिजाब म्‍हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्‍यासाठी वापरलेले वस्‍त्र)

दुशान्‍बे (ताजिकिस्‍तान) – ९६ टक्‍के मुसलमान लोकसंख्‍या असलेल्‍या ताजिकिस्‍तानने कट्टरतावादाच्‍या विरोधात कठोर पाऊल उचलले आहे. देशात महिलांच्‍या हिजाब घालण्‍यावर पूर्ण बंदी आणण्‍यात आली आहे. वर्ष २००७ पासून शाळांमध्‍ये आणि २००९ पासून सार्वजनिक संस्‍थांमध्‍ये हिजाब घालण्‍यावर बंदी होतीच. आता मात्र देशात कुठेही महिला हिजाब किंवा कोणत्‍याही कपड्याने डोके झाकू शकणार नाहीत. गेल्‍या ३ दशकांपासून सत्तेत असलेले अध्‍यक्ष इमोमाली रहमान म्‍हणाले की, धार्मिक ओळख देशाच्‍या विकासात अडथळा ठरत आहे. दुसरीकडे हे पाऊल उचलल्‍यानंतर देशातील धर्मांध लोक सरकारच्‍या विरोधात एकजूट होण्‍याची भीतीही व्‍यक्‍त केली जात आहे.

कट्टरतावादावर लगाम लावण्‍यासाठी अन्‍य नियम

१. मुलांना सार्वजनिक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही, असा कायदा सरकारने केला आहे. परदेशात जाऊनही एखाद्या मुलाने धार्मिक शिक्षण घेतल्‍यास त्‍याच्‍या पालकांना शिक्षा भोगावी लागते.

२. याखेरीज सरकार मशिदीही बंद करणार आहे.

३. ताजिकिस्‍तान सरकारचे म्‍हणणे आहे की, या बंदीचा उद्देश आपल्‍या राष्‍ट्रीय सांस्‍कृतिक मूल्‍यांचे संरक्षण करणे आहे. या माध्‍यमातून अंधश्रद्धा आणि कट्टरतावाद यांच्‍याशी लढण्‍यास साहाय्‍य होऊ शकणार आहे.

४. सरकार इस्‍लामी जीवनशैली आणि अस्‍मिता हे धर्मनिरपेक्षतेला आव्‍हान मानते.

५. सध्‍या देशात दाढी ठेवण्‍याच्‍या विरोधात कोणताही कायदा नाही. असे असले, तरी कुणी दाढी वाढवली, तर सरकारच ती बलपूर्वक कापेल.

६. सरकारने वर्ष २०१७ मध्‍ये १ सहस्र ९३८ मशिदींना टाळे ठोकले. त्‍यांचे रूपांतर चहाची दुकाने आणि वैद्यकीय केंद्र यांमध्‍ये केले जात आहे.

ताजिकिस्‍तान आणि इस्‍लामी आतंकवाद !

ताजिकिस्‍तान सरकार कट्टरतावादाला आपला सर्वांत मोठा शत्रू मानते. गेल्‍या काही वर्षांत येथील शेकडो युवकांनी इस्‍लामिक स्‍टेटमध्‍ये प्रवेश केला. गेल्‍या वर्षी रशियाची राजधानी मॉस्‍कोमध्‍ये क्रोकस सिटी हॉलवर झालेल्‍या आतंकवादी आक्रमणात ताजिक आतंकवाद्यांचा सहभाग होता. या आक्रमणात १४० हून अधिक लोकांचा मृत्‍यू झाला होता.

इस्‍लामिक स्‍टेटमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी सीरिया आणि इराक येथे गेलेल्‍या ताजिक नागरिकांची संख्‍या ही वर्ष २०१४ मध्‍ये २००, २०१५ मध्‍ये १ सहस्र, तर २०१८ मध्‍ये अनुमाने १ सहस्र होती.

संपादकीय भूमिका

  • इंडोनेशियानंतर भारतात जगातील सर्वाधिक मुसलमान रहातात. जिहादी आतंकवादाने भारताला पोखरले असल्‍याने भारतातही हिजाबवर, तसेच मदरशांवरही बंदी घातली पाहिजे.
  • जे एका कट्टरतावादी मुसलमान देशाला जमते, ते धर्मनिरपेक्ष भारताला का जमत नाही ?