Pope Francis : (म्‍हणे) ‘आपला धर्म इतरांवर थोपवू नका !’ – पोप फ्रान्‍सिस

पोप फ्रान्‍सिस यांचा ख्रिस्‍ती धार्मिक नेत्‍यांना फुकाचा सल्ला !

पोप फ्रान्‍सिस

जकार्ता (इंडोनेशिया) – धार्मिक अतिरेकाच्‍या विरोधात आपण काम केले पाहिजे. आपण आपला धर्म इतरांवर थोपू नये. धार्मिक आतंकवाद्यांनी फसवणूक आणि हिंसाचार यांच्‍या माध्‍यमातून लोकांच्‍या श्रद्धा पालटल्‍या आहेत, असे वक्‍तव्‍य ख्रिस्‍ती धर्माचे सर्वोच्‍च धर्मगुरु पोप फ्रान्‍सिस यांनी इंडोनेशियाच्‍या दौर्‍याच्‍या वेळी केले. ते त्‍यांच्‍या सर्वांत मोठ्या, म्‍हणजे १२ दिवसांच्‍या दक्षिण-पूर्व आशियाच्‍या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात ते इंडोनेशिया, पापुआ न्‍यू गिनी, तिमोर लेस्‍त आणि सिंगापूर या देशांना भेटी देणार आहेत.

जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्‍या असलेल्‍या इंडोनेशियामध्‍ये जकार्ता येथील प्रेसिडेंशियल पॅलेसमध्‍ये ८७ वर्षीय पोप यांनी स्‍थानिक कॅथोलिक ख्रिस्‍त्‍यांना संबोधित करतांना म्‍हटले की,

१. धार्मिक अतिरेक रोखण्‍यासाठी कॅथोलिक चर्च विविध धर्मांमधील संवादाला पाठिंबा देईल. अशा प्रकारे आपण पूर्वग्रह दूर करू शकतो आणि परस्‍पर आदर अन् विश्‍वासाचे वातावरण वाढवू शकतो. धार्मिक अतिरेक आणि असहिष्‍णुता यांसारख्‍या आव्‍हानांना तोंड देण्‍यासाठी हे आवश्‍यक आहे. ही आव्‍हाने धर्म पालटून आणि फसवणूक अन् हिंसाचार यांचा वापर करून त्‍यांचे विचार लादण्‍याचा प्रयत्न करतात.

२. असे काही वेळा होते, जेव्‍हा दुर्दैवाने देवावरील श्रद्धेचे शांतता, एकता, संवाद, आदर, सहकार्य आणि बंधुता वाढवण्‍याऐवजी फूट अन् द्वेष यांना प्रोत्‍साहन देण्‍यात रुपांतर होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंना प्रलोभने दाखवून, त्‍यांच्‍या श्रद्धास्‍थानांवर चिखलफेक करून, त्‍यांच्‍या धर्माविषयी त्‍यांची मने कलुषित करून त्‍यांना ख्रिस्‍ती धर्म स्‍वीकारायला लावणार्‍या ख्रिस्‍ती धार्मिक नेत्‍यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?
  • आतापर्यंत हिंदूंवर ख्रिस्‍ती धर्म थोपवून लाखो हिंदूंचे धर्मांतर केलेल्‍या ख्रिस्‍ती धार्मिक नेत्‍यांना पोप काय शिक्षा देणार आहेत ?, हेही पोप यांनी सांगितले पाहिजे !
  • २४ जानेवारी २०१५ या दिवशी पोप यांनी ट्‍वीट केले होते की, धर्मांतर करण्‍यासाठी समाजसेवा हे सर्वोत्तम माध्‍यम आहे. आता ते असे सांगत आहेत. यावरून त्‍यांचा दुटप्‍पीपणा दिसून येत नाही का ?