Shimla Illegal Mosque Protest : महिलांना येथून चालणे कठीण झाले असून लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत ! – अनिरुद्ध सिंह, काँग्रेस

  • शिमला (हिमाचल प्रदेश) येथील अवैध मशिदीचे प्रकरण

  • हिंदूंनी पुन्हा मोर्चा काढून मशिदीला घातला घेराव

  • काँग्रेस सरकारचे मंत्री अनिरुद्ध सिंह यांचे मोर्चाच्या ठिकाणी येऊन विधान

शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील संजौली उपनगरातील ५ मजली अवैध मशिदीच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन चालूच आहे. या अवैध मशिदीच्या विरोधात ५ सप्टेंबरला देवभूमी प्रादेशिक संघटनेचे अध्यक्ष रुमित सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शेकडो लोकांनी संजौली बाजारपेठेत निषेध मोर्चा काढून मशिदीला घेराव घातला. त्यांनी येत्या २ दिवसांत मशिदीवर कारवाई करण्याची सरकारला समयमर्यादा दिली आहे. त्याचवेळी काँग्रेस सरकारमधील ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री अनिरुद्ध सिंह आंदोलस्थळी आले आणि म्हणाले, ‘‘संजौली बाजारात महिलांना चालणे कठीण झाले असून ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत असून त्या राज्य आणि देश यांसाठी धोकादायक आहेत.’’ त्यांच्या या विधानावर एम्.आय.एम्.चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे.

मशीद अवैधपणे बांधण्यात आली आहे ! – मंत्र्यांची स्पष्टोक्ती

मंत्री अनिरुद्ध सिंह म्हणाले की, ही मशीद अवैधपणे बांधण्यात आली आहे. आधी ती एक मजली बांधण्यात आली, नंतर अनुमती न घेता तिचे ५ मजली मशिदीत रूपांतर करण्यात आले. प्रशासनाने या मशिदीचे पाणी आणि वीज यांची जोडणी का तोडली नाही ? परिसरात होणार्‍या मारामार्‍या आणि हिंसाचार यांत केवळ स्थानिक लोक नाहीत, तर बाहेरील घटकही आहेत. राज्यात कामानिमित्त येणार्‍या लोकांची योग्य पडताळणी करावी. केवळ हिमाचल प्रदेशमधील मूळ नागरिकांनाच व्यवसायासाठी परवाना देण्यात यावा.

विरोधी पक्ष भाजपनेही या प्रकरणी अनिरुद्ध सिंग यांना पाठिंबा दिला आहे. व्यापारी यशपाल सिंग यांच्यावर १ सप्टेंबरला मलाणा भागात काही मुसलमानांनी आक्रमण केले होते. यात सिंग यांच्या डोक्याला १४ टाके पडले आहेत. यानंतर संतप्त लोकांनी तेथील एका मशिदीसमोरही निदर्शने केली आणि ती पाडण्याची मागणी केली.

ओवैसी यांची टीका आणि अनिरुद्ध सिंह यांचे प्रत्युत्तर

मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्या वक्तव्यावर खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, हिमाचल प्रदेश सरकार भाजपचे आहे कि काँग्रेसचे ? हिमाचल प्रदेशच्या ‘मोहब्बत की दुकाना’मध्ये केवळ द्वेष आहे.

ओवैसींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना अनिरुद्ध सिंह म्हणाले, ‘‘मंदिर आणि मशिदी या खासगी मालमत्ता नाहीत. येथे वैध आणि अवैध गोष्ट आहे. अवैध हे अवैध आहे. ओवैसी यांचे राजकारण केवळ एका समाजाच्या जोरावर चालते. त्यांनी त्यांचे राज्य सांभाळावे. बाहेरून येणार्‍या लोकांचा प्रश्‍न गंभीर असून त्यांची ओळख पटवणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे लोक हिमाचल प्रदेशमध्ये येत आहेत.

हिमाचल प्रदेशात रोहिंग्या मुसलमानांची घुसखोरी !

मंत्री अनिरुद्ध सिंग यांनी ४ सप्टेंबरला विधानसभेत सांगितले की, आता हिमाचल प्रदेशात प्रतिदिन नवीन लोक येत आहेत. जमातचे लोक कुठूनतरी येत आहेत, ज्यांचा पत्ता नाही. हे रोहिंग्या मुसलमान आहेत का ? बांगलादेशातून आलेल्या १-२ लोकांना मी स्वतः ओळखतो. या मशिदीचे आतापर्यंत ६ सहस्र ३५७ स्क्वेअर फूट बांधकाम अवैधपणे करण्यात आले आहे. त्याहीपेक्षा चिंतेची गोष्ट म्हणजे जि व्यक्ती या खटल्याच्या सुनावणीसाठी येत होती, तिचा या खटल्याशी काहीही संबंध नसल्याचे शिमला महानगरपालिकेला वर्ष २०२३ समजले. प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्याची कागदपत्रे तपासली नाहीत का ?, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

मशिदीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित

शिमला महानगरपालिकेचे आयुक्त भूपेंद्र अत्री यांनी सांगितले की, मशिदीला केवळ एक मजला बांधण्यासाठी अनुमती देण्यात आली होती; मात्र आणखी ३ मजले अवैधपणे बांधण्यात आले आहेत. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून वक्फ बोर्डालाही त्यात पक्षकार करण्यात आले आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोणतेही बांधकाम झालेले नाही.

हिंदु जागरण मंचचे माजी प्रदेशाध्यक्ष कमल गौतम यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी मशीद बांधली आहे, ती हिमाचल प्रदेश सरकारची भूमी आहे. वक्फ बोर्ड हे बोर्ड नसून भूमाफिया आहे. हिमाचल प्रदेश गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले असून ही पवित्र भूमी धोक्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • अवैध बांधकामांचे प्रकरण न्यायालयात गेले की, ते वर्षानुवर्षे रेंगाळत रहाते. यासाठी सरकारने जलद गतीने निकाल लागण्यासाठी व्यवस्था करणे आवश्यक आहे !
  • काँग्रेस सरकारच्या एका मंत्र्याला जे लक्षात येते, ते संपूर्ण पक्षाला का लक्षात येत नाही ? कि पक्ष मुसलमानांच्या लागूंलचालनासाठी याकडे दुर्लक्ष करतो ?