Dhaka Tribune Editor On Bangladeshi Hindus : (म्‍हणे) ‘हिंदूंवरील आक्रमणे धार्मिक नाहीत, तर राजकीय ! – ‘ढाका ट्रिब्‍युन’ दैनिकाचे संपादक जाफर सोभन

बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्‍युन’ दैनिकाचे संपादक जाफर सोभन यांचा हिंदुद्वेषी दावा

बांगलादेशातील ‘ढाका ट्रिब्‍युन’ दैनिकाचे संपादक जाफर सोभन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्‍या पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्‍युत केल्‍यानंतरही हिंदूंवर अत्‍याचार चालूच आहेत. लूटमार, हिंदूंची घरे जाळणे, मंदिरांवर आक्रमण करणे, हिंदूंना सार्वजनिक ठिकाणी मारणे अशा घटना समोर आल्‍या आहेत. बांगलादेशाच्‍या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी बांगलादेशात हिंदूंवर अत्‍याचार झाल्‍याची स्‍वीकृती दिली आहे; पण बांगलादेशी वृत्तपत्र ‘ढाका ट्रिब्‍युन’चे संपादक जाफर सोभन हे मान्‍य करायला सिद्ध नाहीत. २३ ऑगस्‍ट २०२४ या दिवशी प्रकाशित झालेल्‍या ‘बांगलादेशाविषयी भारताने जाणून घ्‍यायच्‍या १० गोष्‍टी’ या शीर्षकाखालील लेखात, जाफर सोभन यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणासाठी कायदा आणि सुव्‍यवस्‍थेला दोष देण्‍याचा प्रयत्न केला. तसेच ‘हा धार्मिक नाही, तर राजकीय हिंसाचार होता’, असे म्‍हटले आहे.

१. लेखाच्‍या अगदी प्रारंभी सोभन यांनी दावा केला आहे की, देशात हिंदूंना धोका नाही. शेख हसीना देशातून गेल्‍यानंतर प्रथम अराजकता होती, कायदा आणि सुव्‍यवस्‍थेची स्‍थिती खालावली होती. दुर्दैवाने ज्‍या लोकांना लक्ष्य करण्‍यात आले होते, त्‍यांपैकी काही हिंदु समुदायातील होते.

२. जाफर सोभन यांनी पुढे लिहिले की, अशा काळात ज्‍या लोकांना लक्ष्य केले जात आहे, ते दुर्बल घटकातील आहेत. (बांगलादेशात समाजातील गरीब आणि श्रीमंत अशा सर्वच स्‍तरांवरील हिंदूंना लक्ष्य करण्‍यात आले. सोभत चुकीची माहिती देत आहेत ! – संपदाक) दक्षिण आशियामध्‍ये अल्‍पसंख्‍य नेहमीच असुरक्षित असतात, हे आपल्‍या सर्वांना ठाऊक आहे. (दक्षिण आशियातील बांगलादेश, पाकिस्‍तान, अफगाणिस्‍तान आदी देशांमधील अल्‍पसंख्‍य हिंदू असुरक्षित आहेत, याउलट भारतातील अल्‍पसंख्‍य मुसलमान मात्र दिवसेंदिवस उद्याम होत चालले आहेत ! – संपदाक)

३. जाफर सोभान यांनी म्‍हटले की, हिंदूंचा नरसंहार करण्‍यासाठी त्‍यांना लक्ष्य करण्‍यात आले, असे म्‍हणणे, ही कल्‍पनारम्‍य गोष्‍ट आहे. (असे आहे, तर बांगलादेशातील निर्मितीच्‍या वेळी असलेली हिंदूंची लोकसंख्‍या घटून ती आता ८ टक्‍क्‍यांहून अल्‍प का झाली आहे ? – संपादक)

४. भारतातील साम्‍यवादी वृत्तसंकेतस्‍थळ ‘स्‍क्रोल’ने त्‍याच्‍या संकेतस्‍थळावर जाफर सोभन यांचा लेख प्रदर्शित केला. पत्रकार शेखर गुप्‍ता यांच्‍या ‘द प्रिंट’ वृत्तसंकेतस्‍थळानेही हा लेख प्रकाशित केला. (बांगलादेशातील हिंदूंवरील असत्‍याचार हे राजकारणातून प्रेरित होते, हे नॅरेटिव्‍ह (कथानक) प्रसारित करण्‍यासाठी भारतातील साम्‍यवादी प्रसारमाध्‍यमे कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, याचे हे उदाहरण ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील प्रसारमाध्‍यमांचे संपादक असे असतील, तर तेथील हिंदूंवरील आक्रमणांविषयी सत्‍य आणि वस्‍तूनिष्‍ठ माहिती जगाला कशी कळणार ?