भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यावरच भारतातील हिंदू सुरक्षित रहातील ! – संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज, दिगंबर आखाडा

श्री. सागर गरुड, प्रतिनिधी

संतश्री बालक योगेश्‍वरदाज महाराज

प्रयागराज – भारत हिंदु राष्ट्र घोषित व्हावे, असे माझ्यासहित सर्वच भारतियांना वाटते. हिंदु राष्ट्र झाल्यास कोणतीच हानी होणार नाही. भारताला घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी आवश्यक नियमावली सिद्ध करणे आवश्यक आहे. हिंदूंसाठी भारत सोडून अन्य कोणताच देश नाही. भारतातील हिंदूंना सर्व बाजूंनी बलहीन करत गेल्यास हिंदु समाज नष्ट होईल आणि केवळ त्यांच्या कथाच उरतील. त्यामुळे सर्व साधू-संत आणि हिंदु समाज स्वत:ला बळकट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची मागणी करत असतील, तर त्यात काही चुकीचे नाही. हिंदु राष्ट्र घोषित केल्यावरच भारतातील हिंदू सुरक्षित रहातील, असे वक्तव्य दिगंबर आखाड्याचे संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी संतश्री बालक योगेश्‍वरदाज महाराज यांची महाकुंभमेळ्यातील त्यांच्या आश्रमात जाऊन भेट घेतली.

या वेळी सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज यांनी धर्मसंसदेत हिंदूहिताविषयी चर्चा, वक्फ कायदा रहित करणे, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे यांविषयी स्पष्ट विचार व्यक्त केले. ‘महाकुंभक्षेत्रात आयोजित केलेल्या धर्मसंसदेत सनातन हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविषयीच्या प्रश्‍नांसंदर्भात सर्व संत, महंत धर्मसंसदेत चर्चा करतील. शासनाकडे याविषयी आवश्यक मागण्याही करण्यात येतील’, असे संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज म्हणाले.

वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी अतीविष्णु महायज्ञ !

यज्ञशाळेला लावलेली वीरगतीला प्राप्त सैनिकांची छायाचित्रे

भारताच्या सीमा बळकट व्हाव्यात, सीमेवरील भारतीय सैन्यांचे रक्षण व्हावे आणि त्यांना बळ प्राप्त व्हावे, यांसाठी संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज यांनी अतीविष्णु यज्ञ आयोजित केला आहे. येथे १०८ यज्ञकुंडांमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी नियमितपणे आहुती अर्पण केली जात आहे. येथे देश-विदेशांतून येणार्‍या भाविकांनाही सैनिकांना श्रद्धाजंली म्हणून आहुती देण्याचे आवाहन करण्यात येते. येथे यज्ञशाळेच्या सर्व बाजूंना वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. शिबिरावर भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आहे. मागील २२ वर्षांपासून संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांसाठी यज्ञयाग करत आहेत. हा त्यांचा ४३ वा महायज्ञ आहे. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे कुटुंबीयही या यज्ञशाळेला भेट देऊन समाधान व्यक्त करत आहेत.

भारतीय सैन्यासाठीचे बालक योगेश्‍वरदास महाराज यांचे कार्य !

देशाच्या सीमेवर जाऊन सैनिकांना भेटणे, त्यांचे मनोबल वाढवणे कार्य संतश्री बालक योगेश्‍वरदास महाराज करतात. त्यांनी देशाच्या सर्व सीमांवर हुतात्मा झालेल्या सैनिकांसाठी महायज्ञ केले आहेत. वर्ष २००६ मध्ये कारगिलमध्ये हुतात्मा सैनिकांसाठी ७५० विद्वानांसह १०८ कुंडी यज्ञ केला. या वेळी वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

स्वतंत्र पाकिस्तान दिल्यावर वक्फ कायद्याची आवश्यकता काय ? 

वक्फ बोर्डाच्या संदर्भात बालक योगेश्‍वरदास महाराज म्हणाले, ‘‘भारताचे विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती केली, तेव्हाच सर्व मुसलमान पाकिस्तानमध्ये जाणे अपेक्षित होते. मुसलमानांसाठी वेगळा प्रांत दिल्यावर मुसलमानांना भारताच्या भूमीवर हक्क सांगण्याचा कोणताच अधिकार नाही. फाळणीनंतर जे मुसलमान भारतात राहिले, त्यांच्या लांगुलचालनासाठीच वक्फ मंडळाची निमिर्ती करण्यात आली आहे.’’