अमित शहांनी दायित्व घ्यावे – संजय राऊत
मुंबई – सैफ अली खानवरील आक्रमणाच्या प्रकरणी खासदार संजय राऊत म्हणाले की, यात कसला आला आहे आंतरराष्ट्रीय कट ? रोहिंगे आणि बांगलादेशी येथे आले असतील, तर अमित शहा यांनी दायित्व घेतले पाहिजे.
मुंबईतील महापौर बंगल्याची डागडुजी होणार !
मुंबई – महापालिकेवर २ वर्षांहून अधिक काळ प्रशासक आहे. वर्ष १९३१ मध्ये बांधलेल्या आणि सध्या रिकाम्या असलेल्या भायखळ्यातील राणीच्या बागेतील महापौर बंगल्याला वाळवी लागल्याचे समोर आले. त्यामुळे वाळवी प्रतिरोधक कामांसमवेत अन्य संरचनात्मक दुरुस्ती मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. या कामासाठी निविदाही काढून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये वृद्ध महिलेचा मृत्यू
मुंबई – मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये २७ व्या माळ्यावरील खोलीत विनती मेहतानी या ६० वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. दार न उघडल्याने कर्मचार्याने दुसर्या चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता महिला मृत झाल्याचे लक्षात आले. ही महिला पेडर रोडवरील चेलाराम हाऊस परिसरात रहात होती. ६ जानेवारीपासून ती खोलीत एकटीच रहात होती.
बीडची पालकमंत्री झाले असते, तर आनंद झाला असता ! – पंकजा मुंडे
मुंबई – अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. जालना येथील पालकमंत्रीपद मिळालेल्या भाजप आमदार पंकजा मुंडे यासंदर्भात म्हणाल्या, ‘‘मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते, तर बीडची सेवा करण्याची संधी लाभली असती आणि अजून आनंद झाला असता.’’
पृथ्वीराज चव्हाण यांचे आमदारकीला आव्हान !
कराड – विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या आमदारकीला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
शासकीय निवासी शाळेत २४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !
विटा (जिल्हा सांगली) – येथील शासकीय निवासी शाळेतील ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावी या वर्गात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. यामुळे त्यांना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.