अन्वेषणासाठी पोलीस आक्रमणाचे नाट्यरूपांतर करणार !

सैफ अली खानवरील आक्रमणाचे प्रकरण

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – अभिनेते सैफ अली खानवर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी मुंबई पोलीस घटनेचे नाट्यरूपांतर रचणार आहेत. पोलीस आंतरराष्ट्रीय कटाच्या दृष्टीकोनातूनही अन्वेषण करणार आहेत. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, रक्ताने माखलेले कपडे यांसह आरोपींशी संबंधित सर्व पुरावे जमवण्यात येणार आहेत.

१९ जानेवारीला मुंबई पोलिसांनी आरोपी महंमद शरीफुल इस्लाम शहजाद याला न्यायालयात उपस्थित केल्यावर त्याचा आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. दुचाकीवरून सोडणार्‍या डोंबिवलीत रहाणार्‍या मित्राने त्याला नोकरी मिळवून दिली होती.

ठाणे परिसरातील हिरानंदानी भागातील कांदळवनातून पकडलेल्या आरोपी शरीफुलने जेवढ्या वेळात भ्रमणभाष चालू केला, तेवढ्या वेळात त्याचे ठिकाण (लोकेशन) शोधून त्याला पोलिसांनी पकडले. तो वरळीत एका कॅफेत काम करत होता आणि तेथील कोळीवाडा परिसरात रहात होता.

आरोपी कुस्तीपटू

आरोपी बांगलादेशातील व्यावसायिक आणि राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आहे. तो नोकरीच्या शोधासाठी मुंबईत आला होता आणि काम मिळत नसल्याने परत जाणार होता. वांद्रे परिसरात हॉटेलमधील काम झाल्यावर तो पायी फिरत असे. सैफच्या इमारतीच्या मागच्या बाजूला कोणताही सुरक्षारक्षक किंवा सीसीटीव्ही नाही, हे पाहून तो सैफच्या घरात घुसला.

१९ ठशांचा पुरावा

घटनास्थळावरून आरोपीच्या बोटांचे ठसे १९ ठिकाणी सापडले आहेत. आरोपी इमारतीत असलेल्या जिन्यावरून चढून आला आणि सैफचा धाकटा मुलगा जहांगीर याच्या खोलीतील शौचालयाच्या खिडकीतून घरात शिरला. हेक्सा ब्लेडसारख्या हत्याराने सैफवर आक्रमण केले. अंगुलीमुद्रा आणि न्यायवैद्यक तज्ञांच्या साहाय्याने महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे.