‘ख्वाजा गरीब नवाब हॉटेल’ हटवण्याची हिंदुत्वनिष्ठांची पोलिसांकडे मागणी

म्हापसा – येथील प्रसिद्ध श्री बोडगेश्वर जत्रोत्सवाच्या फेरीमध्ये ‘हलाल’ प्रमाणित ‘ख्वाजा गरीब नवाब हॉटेल’ उघडण्यात आले आहे. या ठिकाणी ‘हलाल’ प्रमाणित चिकन (कोंबडीचे मांस) विकण्यात येत आहेत. या उपाहारगृहाला येथील स्थानिक हिंदूंनी विरोध केला आहे. या संदर्भातील निवेदन येथील हिंदुत्वनिष्ठांनी म्हापसा पोलीस निरीक्षकांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, हे हॉटेल हलाल प्रमाणित असल्याचे स्पष्ट चिन्ह फलकावर लावलेले आहे. त्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होत आहेत. म्हापसा येथील श्री बोडगेश्वर जत्रा ही गोवा, तसेच गोव्याबाहेरील हिंदूंसाठी महत्त्वाची जत्रा आहे. या जत्रोत्सवाला लाखो भाविक देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. अशा पवित्र स्थानावर हलाल प्रमाणित मांस विकणार्या स्टॉलचे काय काम ? आतापर्यंत ‘थूंक जिहाद’सारखे (खाद्यपदार्थावर थुंकून ते ग्राहकाला विकणे) किळसवाणे प्रकार हिंदूंनी पाहिले आहेत. देवदर्शनासाठी येणार्या भाविकांना हलाल प्रमाणित मांस खायला घालून त्यांना भ्रष्ट करण्याच्या हा डाव नाही ना ? याची चौकशी झाली पाहिजे. जत्रोत्सवाच्या फेरीतील हलाल प्रमाणित ‘ख्वाजा गरीब नवाब हॉटेल’ त्वरित हटवावे, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.’ हिंदूंच्या शिष्टमंडळामध्ये मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत पंडित, सचिव श्री. जयेश थळी, हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश नाईक आदी हिंदूंचा सहभाग होता.
या संदर्भात श्री. रमेश नाईक म्हणाले, ‘‘देवस्थान समितीला केवळ पैसा हवा आहे. त्यांना ना श्री देव बोडगेश्वराविषयी काही वाटते ना हिंदूंविषयी. ते पैसे घेतात आणि स्टॉल लावायला देतात.’’ श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘देवस्थान समितीच्या अनुमतीविना हलाल प्रमाणित स्टॉल लागणे शक्य नाही. त्यांना सांगूनही हा स्टॉल हटवण्यात आला नाही; म्हणून आम्हाला पोलिसांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करावी लागत आहे.’’ यापूर्वी हिंदूंनी फेरीमध्ये अन्य धर्मियांना स्टॉल लावण्यास अनुमती न देण्याविषयी समितीला सुचवले होते; पण समितीने हा देव सर्वांचाच असल्याचे सांगत या मागणीकडे दुर्लक्ष केले होते.