बलात्कारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूची चकमक खोटी असल्याचा अहवाल !

अक्षय शिंदे

मुंबई – बदलापूर येथील शाळेतील २ लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा अक्षय शिंदे हा पोलिसांच्या चकमकीत मारला गेल्याचे सांगण्यात आले होते; मात्र ही चकमक बनावट असल्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. ‘५ पोलीस कर्मचार्‍यांनी बळाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. त्यामुळे हे ५ पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी उत्तरदायी आहेत’, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे.

‘मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला’, असा दावा पोलिसांनी केला होता.

‘अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाहीत’, ‘आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला’, हा दावा संशयास्पद आहे, असे अहवालात म्हटले आहे.

२३ सप्टेंबर २०२४ या दिवशी ही चकमक झाली होती. रिव्हॉल्व्हरमधून झाडलेल्या २ गोळ्यांपैकी एक अक्षय शिंदेच्या डोक्याला, तर दुसरी शरिरावर लागली होती.