अपंगांच्या कल्याणासाठी ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रम !
पुणे – जगातील सर्वांत सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या आवश्यकता ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो, तर भारत निश्चितच आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी केले. ते अपंग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या हेतूने पिंपरी महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या ३ दिवसीय ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
राज्यपाल म्हणाले की, ‘पर्पल जल्लोष’ हा सोहळा म्हणजे समाजाच्या संघटित प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे. जन्मजात अपंगांना लवकर साहाय्य मिळावे, वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी निधी देऊन तो लाभार्थ्यापर्यंत पोचवणे आवश्यक आहे. महापालिका आणि ‘दिव्यांग भवन फाऊंडेशन’ने अपंगांच्या उत्कर्षासाठी, तसेच विकासासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.