(प्रत्येकाच्या बँक खात्याचा एक विशिष्ट ‘क्यू.आर्.कोड’ असतो. तो कुणी स्कॅन केला, तर त्या खात्यात त्याला हवे तितके पैसे जमा करता येतात.)
बीजिंग (चीन) – चीनच्या बाओजी शहरात एका चोराने मंदिराच्या दानपेटीवर स्वत:च्या बँक खात्याचा ‘क्यू.आर्. कोड’ लावला. त्यानंतर त्याच्या खात्यात लाखो रुपये जमा झाले. काही दिवसांनी मंदिरातील पुजार्यांना या ‘क्यू.आर्.कोड’विषयी शंका आली, तेव्हा त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर चोरीचा हा प्रकार उघड झाला.
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या बातमीनुसार बाओजी शहरातील बौद्ध फामेन मंदिरातील सी.सी.टी.व्ही.च्या चित्रीकरणात चोर ‘क्यू.आर्.कोड’ लावत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, चोर इतर लोकांसह दानपेटीजवळ असलेल्या बुद्ध मूर्तीसमोर गुडघे टेकत आहे. त्यानंतर त्याने दानपेटीवरील मंदिराच्या ‘क्यू.आर्.कोड’वर स्वतःचा ‘क्यू.आर्.कोड’ चिकटवला. त्यानंतर हात जोडून तीन वेळा भगवान बुद्धाला नमस्कार केला आणि तो तेथून निघून गेला.
त्यानंतर त्या चोराच्या बँक खात्यात पैसे जमा होऊ लागले. काही दिवसांनी मंदिर प्रशासनाला त्याविषयी संशय येऊन प्रशासनाने पोलिसांत तक्रार केली. सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर त्या चोराला पकडण्यात आले. त्याने याच पद्धतीचा वापर करून इतर प्रांतांतील बौद्ध संस्थांतही चोरी केल्याची स्वीकृती दिली. त्याने या वर्षी सिचुआन आणि चोंगकिंग या नैऋत्य प्रांतांतील मंदिरे, तसेच शानक्सी या वायव्य प्रांतातील मंदिरांमधून तब्बल ३० सहस्र युआन (अनुमाने साडेतीन ते चार लाख रुपये) चोरले होते.