UP Encroachment Removed : गेल्‍या ७ वर्षांत मुक्‍त केली ६७ सहस्र एकर अतिक्रमित सरकारी भूमी !  

उत्तरप्रदेशाचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचा विक्रम

उत्तरप्रदेशामध्‍ये मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशामध्‍ये मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी सरकारीभूमी अतिक्रमणमुक्‍त करण्‍याच्‍या मोहिमेतून गेल्‍या ७ वर्षांत आतापर्यंत ६७ सहस्र एकर भूमी मुक्‍त केली आहे. तसेच येथे चालणारे बेकायदेशीर कृत्‍येही यामुळे थांबली आहेत. मुक्‍त केलेल्‍या भूमींवर गरीब जनतेसाठी घरे बांधली जात आहेत. तसेच स्‍टेडियमही बांधण्‍यात आले आहे. इतके करूनही अद्याप सहस्रो एकर भूमी अतिक्रमित असून त्‍या मुक्‍त करण्‍यासाठी सरकार कायदा करण्‍याचा प्रयत्न करत आहे.

१. मुख्‍तार अन्‍सारी नावाच्‍या कुख्‍यात गुंडाने अतिक्रमित केलेली भूमी मुक्‍त करून तेथे गरिबांसाठी सदनिका बांधल्‍या जात आहेत.

२. ‘लखनौ विकास प्राधिकरण प्रधानमंत्री आवास योजने’च्‍या अंतर्गत ३०० चौरस फुटांच्‍या ७६ सदनिका बांधल्‍या जात आहेत. त्‍या लॉटरीद्वारे गरिबांना देण्‍यात येणार आहेत. प्रत्‍येक सदनिकेचे मूल्‍य साडेसात लाख रुपये असणार आहे. त्‍यासाठी सरकार अडीच लाख रुपयांचे अनुदानही देणार आहे.

३. प्रयागराजमध्‍ये गुंड अतिक अहमद याच्‍या कह्यातून मुक्‍त झालेल्‍या भूमीवर स्‍टेडियम बांधण्‍यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • उत्तरप्रदेशामध्‍ये इतकी एकर भूमी अतिक्रमित असेल, तर देशात किती असेल ? योगी आदित्‍यनाथ जे करू शकतात, ते अन्‍य राज्‍य आणि केंद्र सरकार का करू शकत नाही ?
  • अतिक्रमण मुक्‍त केलेली भूमी इतकी आहे, तर अद्याप मुक्‍त न केलेली भूमी किती असेल ?
  • ही भूमी अतिक्रमित होत असेपर्यंत गुन्‍हेगारांवर कारवाई न करणारे आणि त्‍यांना साहाय्‍य करणारे यांचा शोध घेऊन त्‍यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे !