१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने…
१. वर्ष १९४७ मधील भारताच्या फाळणीमुळे झालेले धार्मिक आणि सांस्कृतिक परिणाम
‘बरोबर ७७ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट या दिवशी, म्हणजे १४ दिवसांनी आलेली रात्र फाळणीची रात्र होती. एकेकाळी अतिशय शक्तीशाली, वैभवशाली आणि संपन्न असलेल्या आपल्या अखंड भारताचे ३ तुकडे झाले. पवित्र सिंधू नदी आपल्यासाठी परकी झाली. राजा दाहीरच्या शौर्याची गाथा सांगणारा सिंध प्रांत आपल्याकडून हिसकावून घेतला गेला. सहस्रो वर्षांपासून शेती आणि व्यवसाय करणारे आपले लाखो सिंधी बंधू-भगिनी एका रात्रीत विस्थापित झाले. आपला बहरलेला आणि समृद्ध पंजाबही अर्धा गेला. गुरु नानकदेवजींचे जन्मस्थान असलेल्या पवित्र ‘नानकाना साहिब गुरुद्वारा’ही गेले. ‘गुरुद्वारा पंजासाहिब’ही गेले. महाराजा रणजितसिंह यांच्या शौर्याच्या खुणा लोप होत राहिल्या. देवीच्या शक्तीपीठांपैकी एक असलेले पवित्र हिंगलाजदेवीचे मंदिरही आपल्यासाठी परके झाले. पवित्र दुर्गा कुंडाने सजलेले पूर्वेचे व्हेनिस म्हणून ओळखले जाणारे बंगालचे ‘बारिसाल’ आपल्यापासून हिरावण्यात आले. ढाक्याची देवी ढाकेश्वरीही आपल्यासाठी परकी झाली.
२. भारताची रक्तरंजित फाळणी का झाली ?
या फाळणीच्या वेळी १२ ते १५ लाख लोक मारले गेले आणि दीड कोटी लोक विस्थापित झाले. या फाळणीचे एकमेव कारण, म्हणजे स्वतंत्र राष्ट्रासाठी मुसलमानांचा आडमुठेपणा आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेले ‘डायरेक्ट ॲक्शन डे’सारखे (थेट कृती दिवसासारखे) जघन्य हत्याकांड ! वर्ष १९४७ ची फाळणी थेट धर्मावर आधारित होती. ‘पाकिस्तानची निर्मिती मुसलमानांसाठी झाली असून सर्व मुसलमान तेथे जातील’, असे सांगण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसंख्येच्या देवाणघेवाणीची जोरदार मागणी केली होती; पण म. गांधी आणि नेहरू यांच्या आग्रहामुळे भारतातील मुसलमानांना भारतातच रहाण्यास सांगण्यात आले. पाकिस्तानात असे घडले नाही. तेथे असे वातावरण निर्माण झाले की, तेथील बहुतांश हिंदूंना तेथून स्थलांतर करावे लागले. आज पाकिस्तानमध्ये जेमतेम १.९७ टक्के हिंदू शिल्लक उरले आहेत, जे नरकापेक्षाही वाईट जीवन जगत आहेत. तीच अवस्था बांगलादेशातील हिंदूंची आहे, जे केवळ ७.९ टक्के शिल्लक आहेत. थोडक्यात पाकिस्तान (आणि नंतर त्याचा तुटलेला बांगलादेश) मुसलमान राष्ट्र झाले; पण भारत हिंदु-मुसलमान राष्ट्र राहिला. हळूहळू भारतातील मुसलमानांची लोकसंख्या वाढली आणि त्यांची टक्केवारीही वाढली.
३. भारतीय मुसलमानांनी इंडोनेशियाच्या मुसलमानांकडून बोध घेणे आवश्यक !
जर ही मुसलमान लोकसंख्या भारताच्या मुख्य प्रवाहात सामावली असती, भारताच्या पूर्वजांमध्ये त्यांचे पूर्वज शोधले असते आणि भारताच्या प्रथा-परंपरांचा आदर केला असता, तर प्रश्नच उद्भवला नसता. इंडोनेशिया हा त्याचा जिवंत पुरावा आहे. इंडोनेशियामध्ये जगातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या आहे; पण तेथील मुसलमान त्या राष्ट्राच्या मुख्य प्रवाहाला त्यांचे समजतात. ते तेथील पूर्वज आणि परंपरा यांना मानतात अन् याचा त्यांना अभिमान आहे. त्यामुळे तेथील विद्यालये आणि विद्यापिठे यांच्या बाहेर सरस्वतीदेवीच्या भव्य मूर्ती आहेत, त्यांच्या चलनी नोटांवर गणपतीचे चित्र आहे आणि त्यांच्या भाषेत ७० टक्के संस्कृत शब्द आहेत. दुर्दैवाने भारतातील मुसलमानांनी हे केले नाही. स्वातंत्र्यापूर्वी मुस्लीम लीग ज्या मार्गांवर चालली होती, त्याच मार्गांवर ते चालत राहिले. त्यामुळेच फाळणीच्या ७७ वर्षांनंतरही आज जे स्वर कानी पडत आहेत, ते अत्यंत चिंताजनक आहेत.
४. भाजपच्या विरोधात एकगठ्ठा मतदान करण्यासाठी मुसलमानांची रणनीती
आपण परत स्वातंत्र्यपूर्व स्थितीत पोचत आहोत का, असे वाटण्यासारखे पुरेसे पुरावे मिळत आहेत. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जे चित्र समोर आले आहे, त्यावरून ही गोष्ट अधिक स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत मुसलमानांना त्यांच्या मुल्ला-मौलवींनी (इस्लामच्या धार्मिक नेत्यांनी) स्पष्ट सूचना दिल्या होत्या, ‘त्यांनी केवळ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करू नये, तर भारतीय जनता पक्षाला पराभूत करू शकणार्या उमेदवारालाच मतदान करा, म्हणजे एखादा मुसलमान उमेदवारही रिंगणात असेल आणि भाजपला पराभूत करण्याची क्षमता त्याच्यात नसेल, तर त्याला मत देऊ नका.’
या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडी’ आघाडीच्या उमेदवारांना मुसलमानांनी प्रचंड समर्थन दिले. धुळ्यामध्ये ६ पैकी ५ मतदारसंघांत लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार १ लाख ९० सहस्र मतांनी पुढे होते; परंतु मुसलमानबहुल मालेगाव (मध्य) या एका मतदारसंघाने काँग्रेसच्या उमेदवाराला १ लाख ९३ सहस्र मतांची आघाडी दिली आणि भाजपचा ३ सहस्र मतांनी पराभव झाला. येथे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन समाज आघाडी’चे जहूर अहमद महंमदही निवडणुकीच्या रिंगणात होते; मात्र मुसलमान मतदारांनी त्यांना पूर्णपणे नाकारले. त्यांना ५० सहस्र मतेही मिळाली नाहीत. रणनीतीचा भाग म्हणून मुसलमानांनी त्यांची सर्व मते काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना दिली आणि त्यांचा विजय निश्चित केला. असे देशभरातील बहुतेक लोकसभा मतदारसंघांत घडले. त्यामुळे काँग्रेसचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
५. काँग्रेस चुकीची पुनरावृत्ती करणार का ?
काँग्रेसचे नेते मुसलमानांसाठी ‘काहीही’ करायला सिद्ध आहेत. येथेच काँग्रेस मोठी चूक करत आहे. स्वातंत्र्यापूर्वी १९३० च्या दशकात मुसलमानांच्या लांगूलचालनामुळे काँग्रेस आणि विशेषत: म. गांधी यांना ‘सर्व मुसलमान समाज मुस्लीम लीगसमवेत नाही, तर काँग्रेसच्या समवेत आहे’, असे वाटू लागले होते. प्रारंभी मुस्लीम लीगनेही हाच अपसमज करून घेतला. वास्तविक चित्र वर्ष १९४५ च्या निवडणुकीत समोर आले. त्या वेळी काँग्रेसने मुस्लीम लीगला तोडण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. मुसलमान लांगूलचालनाने भरलेल्या आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या या निवडणुकीत काँग्रेसला मुसलमानांकडून पुष्कळ अपेक्षा होत्या; पण दुर्दैवाने काँग्रेसला मुसलमानांसाठी राखीव असलेल्या ३० पैकी एकही जागा मिळाली नाही. देशभरातील मुसलमानांनी काँग्रेसला पूर्णपणे नाकारले आणि मुस्लीम लीगला जोरदार पाठिंबा दिला.
६. पाकिस्तानमध्ये रहायला जाण्याची गांधीजींची इच्छा अपूर्ण
म. गांधीजींना स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात रहायला जाण्याची तीव्र इच्छा होती. ‘श्रीमान गांधी त्यांचे उर्वरित दिवस पाकिस्तानात घालवतील’ (मिस्टर गांधी टू स्पेंड रेस्ट ऑफ हिज डेज इन पाकिस्तान), असा ८ ऑगस्ट १९४७ च्या मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या बातमीचा मथळा होता. ‘आपण पाकिस्तानातील मुसलमानांचे मत पालटू शकतो’, असा त्यांचा विश्वास होता; पण दुर्दैवाने पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जिना, पंतप्रधान लियाकत अली खान किंवा इतर मोठे राष्ट्रीय नेते सोडा, पाकिस्तानच्या गल्लीतील नेत्यानेही गांधीजींना पाकिस्तानात बोलावले नाही. थोडक्यात मुसलमानांनी काँग्रेसला ‘वापरा आणि फेका’ (यूज अँड थ्रो), अशा प्रकारे स्वीकारले होते.
७. काँग्रेस उमेदवाराऐवजी स्वधर्माच्या उमेदवाराला निवडून देणारे मुसलमान
याची झलक मुसलमानांनी काँग्रेसला वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही दाखवली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी वर्ष १९९९ पासून बंगालमधील बहरामपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकत आहेत. हा मुसलमानबहुल (५२ टक्के मुसलमान मतदार) मतदारसंघ आहे. अधीर रंजन चौधरी यांनी गेल्या २२ वर्षांत या भागातील मुसलमानांसाठी जे काही करता येईल, ते केले होते; पण या वेळी रणनीती म्हणून मुसलमानांनी तृणमूल काँग्रेसच्या माध्यमातून गुजरातच्या युसूफ पठाणला बहरामपूर येथून निवडणूक लढवायला लावले. ‘मा-माटी-माणूष’चा नारा देणार्या तृणमूल काँग्रेसने बंगाली भाषेचा ‘ब’ही ठाऊक नसलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली. मुसलमान समाजाची रणनीती अगदी स्पष्ट होती. त्यांचा कोणताही गोंधळ आणि किंतु-परंतु नव्हता. या वेळी त्यांना बहरामपूरमधून मुसलमान उमेदवार निवडून आणायचा होता आणि त्यांनी ते केले. तेही गेली अनेक वर्षे मुसलमानांचे लांगूलचालन करून राजकारण करणार्या अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करून..!
८. भारताची परत एका फाळणीकडे वाटचाल ?
या सगळ्याचा अर्थ सुस्पष्ट आहे. आपण इतिहासाची पुनरावृत्ती करणार आहोत. वर्ष १९३०-१९४० च्या दशकात या देशात जे घडले, त्याचीच पुढील पुनरावृत्ती येत्या ५-१० वर्षांत होण्याची शक्यता आहे. हलाल प्रमाणपत्राचा आग्रह, सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्याचा आग्रह, रस्त्यावर नमाजपठण करण्याचा आग्रह, हिजाबचा आग्रह करत करत हे प्रकरण वेगळ्या ‘मोगलीस्तान’च्या आग्रहापर्यंत पोचणार असल्याचे दिसून येत आहे. या १४ ऑगस्ट या दिवशी जेव्हा देश ‘फाळणीचा दिवस’ साजरा करत असेल, तेव्हा आपल्या सर्वांच्या मनात, ‘आपण परत एका फाळणीकडे वाटचाल करत आहोत का…?’, हा प्रश्न निश्चितच डोकावत असेल.’
– श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रचिंतक, अभियंता आणि लेखक, जबलपूर, मध्यप्रदेश. (१.८.२०२४)
(साभार : श्री. प्रशांत पोळ यांचे फेसबुक)