Hizbollah fired missiles at Israel : हिजबुल्लाने इस्रायलवर डागली ५० क्षेपणास्त्रे, इस्रायली प्रणालीने सर्वांना केले निकामी !

इस्रायल आणि आतंकवादी गट यांच्यामधील संघर्ष !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलनेच(Israel) हमासचा प्रमुख इस्माईल हानिया (Ismail Hania) याला इराणची राजधानी तेहरान येथे वास्तव्यास असतांना ठार केल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हमास, तसेच इराण यांच्याकडून इस्रायलवर आक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता इराणसमर्थक संघटना हिजबुल्लाने इस्रायलवर एकामागून एक अशी तब्बल ५० क्षेपणास्त्रे डागली. ३ ऑगस्टच्या सायंकाळी दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलच्या उत्तर भागात हे आक्रमण करण्यात आले; परंतु ‘आयर्न डोम’ या इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीने सर्वची सर्व क्षेपणास्त्रे निकामी केली. अनेक क्षेपणास्त्रांना तर हवेतच नष्ट करण्यात आले. त्यामुळे या आक्रमणात इस्रायलची कोणतीही हानी झाली नाही.

इस्त्रायलला सध्या एकाच वेळी अनेक आघाड्यांवर संघर्षाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे गाझा आणि रफाह येथे हमासच्या विरोधात सैनिकी संघर्ष चालू असून आता लेबनॉन सीमेवर हिजबुल्लाशी दोन हात करावे लागत आहेत. इराणकडूनही इस्रायलच्या विरोधात कारवाईची सिद्धता चालू आहे. या सगळ्यात हिजबुल्लाचा प्रमुख कार्यकर्ता अली अब्द अली हा दक्षिण लेबनॉनमधील बाजोरीह येथे ३ ऑगस्टच्या सकाळी इस्रायली ड्रोन आक्रमणात ठार झाला होता.