Kanwar Yatra Uttarakhand : हरिद्वार (उत्तराखंड) येथेही दुकान मालकांना त्यांची नावे लिहिण्याचा आदेश !

हरिद्वार (उत्तराखंड) – उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कावड यात्रेच्या वेळी दुकान मालकांनी त्यांच्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहावे, असा अदेश देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे. या आदेशामुळे दुकानमालक आणि दुकानातील कर्मचारी यांची नावे दर्शनी भागात लिहिणे आवश्यक असणार आहे. त्या आधारे प्रशासनाकडून दुकानदारांची पडताळणी केली जाणार आहे. २२ जुलैपासून कावड यात्रा चालू होणार आहे.

पोलिसांकडून हॉटेल आणि ढाबे यांच्या मालकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना देण्यात आली आहे. सूचनांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याची चेतावणीही पोलिसांनी दिली आहे; मात्र असे असतांनाही हरिद्वार परिसरातील अनेक हॉटेलचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन केलेले नाही.

अंडी, लसूण आणि कांदा यांवर बंदी !

कावड यात्रेदरम्यान पोलिसांनी हॉटेल आणि ढाबा चालक यांना ‘मांस, अंडी, लसूण आणि कांदा वापरू नये’, अशी सूचना दिली आहे. मद्यप्राशन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल आणि ढाबे यांमध्ये विक्री करण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांची सूचीही दर्शनी भागात लावण्यास सांगण्यात आले आहे.