Bhojshala ASI Survey : मध्‍यप्रदेशातील भोजशाळेचे सर्वेक्षण पूर्ण

पुरातत्‍व विभाग सर्वेक्षणाचा अहवाल उच्‍च न्‍यायालयाला सादर करणार !

धार (मध्‍यप्रदेश) – येथील भोजशाळेतील भारतीय पुरातत्‍व विभागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात हिंदूंच्‍या देवतांच्‍या अनेक मूर्तींसह शेकडो अवशेष सापडले आहेत. या सर्वेक्षणाचा अहवाल आता न्‍यायालयात सादर केला जाणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ जुलै २०२४ या दिवशी होणार आहे.

१. सर्वेक्षणाच्‍या ९८ दिवसांत पुरातत्‍व विभागाने भोजशाळेच्‍या परिसरातून १ सहस्र ७१० अवशेष कह्यात घेतले आहेत. हे अवशेष मिळवण्‍यासाठी विभागाने भोजशाळेतील २४ ठिकाणी उत्‍खनन केले. या सर्वेक्षणात आतापर्यंत भोजशाळेच्‍या परिसरातून ३९ मूर्ती सापडल्‍या आहेत. या मूर्तींची स्‍वच्‍छता करून त्‍यांची ओळख पटवली जात आहे.

२. सर्वेक्षणात सापडलेल्‍या मूर्ती वाग्‍देवी (सरस्‍वती), महिषासुर मर्दिनी, श्री गणेश, श्री हनुमान, ब्रह्मा आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या आहेत. यांतील काही मूर्ती चांगल्‍या स्‍थितीत आहेत, तर काही जीर्णावस्‍थेत आहेत. ब्रह्मदेवाची मूर्ती सुस्‍थितीत आहे, तर देवीची मूर्ती तुटलेली आढळून आली आहे. तसेच अनेक खांब आणि शिलालेख हेही सापडले आहेत.

३. सर्वेक्षणासाठी पुरातत्‍व विभागाला न्‍यायालयाकडून ४२ दिवसांची अनुमती मिळाली होती; परंतु नंतर ती वाढवण्‍यात आली.

४. पुरातत्‍व विभाग न्‍यायालयात सादर करणार्‍या अहवालात तज्ञांच्‍या मतांसह अवशेषांविषयीची सर्व माहिती न्‍यायालयासमोर सादर करेल. सर्वेक्षणाच्‍या वेळी येथे ‘कार्बन डेटिंग’ही (वस्‍तू किती जुनी आहे ते मोजण्‍यासाठी करण्‍यात येणारी चाचणीही) करण्‍यात आली असून याविषयीचा वेगळा अहवाल सिद्ध करण्‍यात येणार आहे.

५. सर्वेक्षणाच्‍या कालावधीत मुसलमान पक्षाने पुरातत्‍व विभागाने न्‍यायालयाच्‍या आदेशांचे उल्लंघन केल्‍याचा दावा केला.

६. सर्वेक्षण चालू असतांना भोजशाळा पर्यटकांसाठी बंद ठेवण्‍यात आली होती आणि आताही ती बंदच ठेवण्‍यात येणार आहे. केवळ मंगळवारी हिंदु पक्षाला पूजा करण्‍याची, तर शुक्रवारी मुसलमानांना नमाजपठण करण्‍याची अनुमती दिली गेली आहे.

७. ११ मार्च २०२४ या दिवशी मध्‍यप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने भोजशाळेचे पुरातत्‍व विभागाकडून सर्वेक्षण करण्‍याचा आदेश दिला होता. भोजशाळा श्री सरस्‍वतीदेवीचे मंदिर आहे जे वर्ष १०००-१०५५ च्‍या काळात राजा भोजने बांधले होते. काही शतकांपूर्वी मोगलांनी आक्रमण करून येथे मौलाना कमालउद्दीन (ज्‍यांच्‍यावर अनेक हिंदूंना फसवून मुस्‍लिम बनवल्‍याचा आरोप आहे) याची कबर बांधली. त्‍यानंतर येथे मुसलमान लोक येऊ लागले आणि नमाजपठण करू लागले.