वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) : राष्ट्र, धर्म, संस्कृती संरक्षण
रामनाथी, गोवा – एकदा अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाकिस्तानचा एक अधिकारी आला आणि काश्मीरचा नकाशा पाहून त्यांना म्हणाला, ‘ही टोपी तुम्ही काढून द्या.’ त्या वेळी ते त्याला म्हणाले, ‘‘ही टोपी नाही, हे आमचे शीर आहे आणि शीर कुणी काढून देत नाही.’’ काश्मीरला ८ सहस्र ५०० वर्षांपेक्षाही पूर्वीपासूनचा इतिहास आहे. ऋषि कश्यप यांची ही नगरी काही शेकडो वर्षांपूर्वी भारतातील शिक्षणाचे माहेरघर होती. येथील आजची झेलम म्हणजे वितस्ता नदी म्हणजे साक्षात् पार्वतीदेवीचे रूप आहे. शिवाने पार्वतीला आज्ञा करून तिला तिथे पाठवले आहे.
५०० वर्षे काश्मीरवर आक्रमणे झाली. मुसलमान शासकांनी अत्यंत क्रूर अशी बंधने येथील हिंदूंवर लादली. त्यामुळे हिंदू वंश नष्ट झाला. आतापर्यंत ७ वेळा कश्मिरी लोकांना काश्मीरमधून पूर्णतः पलायन करावे लागले आहे. मुसलमान शासकांनी येथील मार्तंड मंदिर या सूर्यमंदिरासह शेकडो मंदिरे नष्ट केली. गेल्या काही दिवसांत सैन्याने येथील काही छोटी मंदिरे पुन्हा उभारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती उत्तरप्रदेश येथील प्रज्ञा मठ पब्लिकेशचे लेखक आणि प्रकाशक मेजर सरस त्रिपाठी यांनी दिली. २७ जून या दिवशी वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या ‘राष्ट्र, धर्म, संस्कृती संरक्षण’ या सत्रात ‘सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणात सैन्याची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.