Asaduddin Owaisi : असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा ! – अधिवक्ता पू. हरिशंकर जैन

संसदेत पॅलेस्टाईनशी निष्ठा दर्शवल्यावरून अधिवक्ता पू. हरिशंकर जैन यांची राष्ट्रपतींकडे मागणी

खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – एम्.आय.एम्. पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन’ असे म्हणत अल्लाहू अकबर (अल्ला महान आहे) अशा घोषणा दिल्या होत्या. यावरून ओवैसी यांना जोरदार विरोध केला जात आहे. त्यांची खासदारकी रहित करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. भाजपच्या अनेक खासदारांनी ओवैसी यांच्या घोषणांवर आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे.

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

यासंदर्भात अधिवक्ता पू. हरिशंकर जैन यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात राज्यघटनेच्या कलम १०२ आणि १०३ अंतर्गत राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. अधिवक्त्या अमिता सचदेवा, तसेच अधिवक्ता विभोर आनंद यांनीही लोकसभा सचिवालयात अशीच तक्रार केली आहे. भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी म्हटले की, तुम्हाला पॅलेस्टाईनवर इतके प्रेम असेल, तर बंदूक उचला आणि पॅलेस्टाईनला जा. यावर उद्दाम असलेले ओवैसी म्हणाले की, जे काही बोललो, ते सर्वांसमोर बोललो आहे.

संसदेच्या विद्यमान नियमानुसार, कोणत्याही सभागृहाच्या सदस्याने परकीय राज्याशी (देशाशी) निष्ठा दर्शवल्यास त्याला लोकसभा किंवा कोणत्याही सभागृहाच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.

संपादकीय भूमिका

ओवैसी यांच्यासारख्या भारतविरोधी लोकांकडून अशा प्रकारची वक्तव्ये होणे, हे आश्‍चर्याचे नसले, तरी या माध्यमातून पॅलेस्टाईनशी निष्ठा, म्हणजे स्वदेशापेक्षा इस्लामप्रती निष्ठा दर्शवणारेच त्यांचे वक्तव्य असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी !