‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द भारतातच काय; पण विदेशातही आता कुणासाठी नवीन राहिलेला नाही. साधारण १५ वर्षांपूर्वी हा शब्द उच्चारणेही जणू गुन्हा होता; मात्र वर्ष २००२ मध्ये हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली, तीच मुळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ! अशा प्रकारे एकेकाळचा ‘वर्जित’ शब्द आज ‘सर्वमान्य’ होणे, हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मोठे यश आहे.
१. हिंदु राष्ट्र म्हणजे सनातन वैदिक धर्मातील नियमांवर आधारित उदात्त व्यवस्था !
स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे, ‘हे राष्ट्र जिवंत रहावे’, अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.’ हिंदु राष्ट्र, म्हणजे केवळ ‘हिंदूंचा देश’ एवढाच संकुचित विचार नाही. ‘राष्ट्र’ या संकल्पनेत भूमी आणि जनसमूह यांसह तेथील लोकांची संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, धर्म, साहित्य, कला अन् राजनीती ही सूत्रेही अंतर्भूत असतात. हिंदु राष्ट्र ही कुठलीही राजकीय संकल्पना नाही, तर सनातन वैदिक धर्मातील नियमांना अनुसरून असणारी एक उदात्त व्यवस्था आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राला होणारा विरोधच मुळात अनाठायी आहे.
२. हिंदु राष्ट्रविरोधी ‘नॅरेटिव्ह’ (खोटे कथानक) !
आज विरोधकांकडून ‘हिंदु राष्ट्रा’च्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जात आहे. त्यासाठी ते नानाविध ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) रचत आहेत. त्यामध्ये ‘धर्मावर आधारलेला पाकिस्तान आज भिकेला लागला असतांना तुम्हाला ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता का आहे ?’ किंवा ‘आज देशात बेकारी, गरिबी आदी अनेक समस्यांनी देशाला ग्रासले असतांना त्यावर उपाय काढण्याऐवजी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’साठी प्रयत्न का करत आहात ?’, अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आहे. अशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, आज जर देश स्वतंत्र होऊन ७६ वर्षांहून अधिक काळ गेला असतांनाही देशात बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, हिंसाचार आदी समस्या थांबलेल्या नसतील, तर हे ७६ वर्षांतील शासन व्यवस्थेचे अपयश नाही का ? ‘येत्या काळात या समस्या कमी होतील’, असेही ठामपणे कुणी शासनकर्ता सांगू शकणार नाही. पाकिस्तान आज कंगाल होऊन भिकेला लागला आहे; म्हणून तेथील इस्लामिक राज्य नष्ट करण्याची मागणी कुणी करत आहे का ? आज युरोपातील अधिकतर श्रीमंत देश स्वतःला ‘ख्रिस्ती देश’ म्हणवून घेतात, तर ते गरिबांची काळजी करत नाहीत, असे म्हणायचे का ? तर मग या देशाला सर्व समस्यांपासून सोडवून एक आदर्श राष्ट्र बनवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी कुणी करत असेल, तर त्यात चूक काय ?
३.‘गझवा-ए-हिंद’चे (भारताचे इस्लामीकरण) संकट गडद !
भारत आणि हिंदु यांच्यावरील संकटांची मालिका आपण सर्वच जण जाणतो; पण त्यातही सर्वांत गंभीर संकट आहे ते ‘गझवा-ए-हिंद’चे ! हा शब्द कदाचित् आपल्या सर्वांना नवीन असेल; पण सध्या वादळापूर्वीच्या शांततेच्या रूपात असलेले हे संकट तुमच्या-आमच्या भोवती सतत घोंगावत आहे. ‘गझवा-ए-हिंद’चा अर्थ आहे ‘भारताचे इस्लामीकरण करणे !’ सध्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला लव्ह जिहाद, भूमी जिहाद, हलाल जिहाद हे याच ‘गझवा-ए-हिंद’चे छोटे रूप आहे. यासंदर्भात हिंदूंनी जागे होणे सोडाच; पण त्यांना अद्यापही या संकटाची पुसटशीही कल्पना नाही. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्यात सजगता आणणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी ‘गझवा-ए-हिंद’ला ‘हिंदु राष्ट्र’ हेच एकमेव उत्तर आहे’, हे हिंदूंच्या मनावर अंकित करावे लागेल.
४. ‘सेक्युलर’ (निधर्मीपणाचे) लाड थांबवा !
वर्ष १९७६ मध्ये देशात आणीबाणी लागू असतांना आणि संपूर्ण विरोधी पक्ष कारागृहात असतांना काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राज्यघटनेची ४२ वी सुधारणा म्हणून राज्यघटनेच्या मूळ प्रस्तावनेत नसलेले ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ (समाजवादी) हे शब्द घुसडले. तेव्हापासून हिंदूंची मुस्कटदाबी आणि अल्पसंख्यांकांचे, विशेषतः मुसलमानांचे लांगूलचालन मोठ्या प्रमाणात चालू झाले. राज्यघटनेत असा पालट करणे, हा घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होता; पण आजतागायत एकही पुरोगामी यावर बोलत नाही. याच ‘सेक्युलरवादा’च्या नावाखाली पुरोगाम्यांकडून ‘हिंदु राष्ट्रा’ला विरोध केला जात आहे. हेच पुरोगामी ‘गझवा-ए-हिंद’विषयी मात्र चकार शब्दही काढत नाहीत, हे विशेष ! त्यामुळे राज्यघटनेत घुसडलेले हे शब्द वगळून त्याजागी संवैधानिकरित्या ‘हिंदु राष्ट्र’ आणि ‘आध्यात्मिक’ हे शब्द राज्यघटनेत समाविष्ट केले जाऊ शकतात. यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा न्यायालयीन लढा चालू आहे.
५. हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग राजकीय नाही !
‘कोणता तरी पक्ष सत्तेत आल्यामुळे हिंदु राष्ट्र येणार’, अशी आमची भूमिका कधीच नव्हती किंवा ‘राजकीय मार्गाने सत्ता स्थापन करून हिंदु राष्ट्र येणार’, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. हिंदु राष्ट्र हे त्यासाठी तन, मन आणि धन अर्पण करून निरपेक्षपणे कार्य करणार्यांच्या संघटनातून साकार होणार आहे. आज भारतात १०० कोटी हिंदूंनी जर हिंदु राष्ट्राची मागणी केली, तर ती रोखणे अशक्य आहे. हिंदूंना त्यांच्या बहुसंख्य असण्याचे राजकीय भान निर्माण झाल्यास आणि राजकारण्यांनी जाती-जातींमध्ये निर्माण केलेले भेद दूर झाल्यास हिंदु राष्ट्र फार दूर नाही.
६. आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांची थोडक्यात फलनिष्पत्ती !
अ. देशभरातील १००० हून अधिक संघटना संघटित होऊन राष्ट्र-धर्मासाठी कार्य करत आहेत.
आ. अधिवेशनात स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलना’द्वारे देशभरातील विविध संघटनांना एकत्र घेऊन १८०० हून अधिक राष्ट्र-धर्म यांवरील आघातांच्या विरोधात यशस्वी आंदोलने झालेली आहेत.
इ. श्री तुळजापूर मंदिर संस्थान, कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर, शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान आदी अनेक मंदिरातील भ्रष्टाचार उघड केला आहे. या अधिवेशनातून मंदिरांच्या संघटनासाठी आणि मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी मंदिर महासंघाचे कार्य आज महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत चालू आहे. अनुमाने १४ सहस्र मंदिरे आज या दृष्टीने संघटित होण्यासाठी संपर्कात आहेत. हे पुष्कळ मोठे कार्य आहे. याच माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील ६५० मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (पारंपरिक पोषाख) लागू झाली आहे.
ई. गड-दुर्गांवरील अतिक्रमणाच्या विरोधात महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. शासनाने त्याची नोंद घेऊन माहीम, लोहगड आदी गडांवरील अतिक्रमणे हटवण्याला प्रारंभ केला आहे. अशी अनेक कामे सांगता येतील.
७. हिंदु राष्ट्रातच खर्या अर्थाने सुरक्षिततेची आणि समृद्धीची ‘गॅरेंटी’ (हमी) !
या सर्वांवरून तुम्हाला ‘अब की बार, हिन्दु राष्ट्र की पुकार’ किती आवश्यक आहे, हे लक्षात आलेच असेल. त्यासाठी ‘मी आणि माझे’, असा संकुचित विचार त्यागून विश्वाच्या कल्याणाचा विचार करणार्या हिंदु राष्ट्राचे साक्षीदार नव्हे, तर भागीदार व्हा ! याचे कारण हिंदु राष्ट्रातच नागरिकांना खर्या अर्थाने सुरक्षिततेची आणि समृद्धीची ‘गॅरेंटी’ मिळेल !
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी जागृती आणि संघटन यांसाठी हिंदु राष्ट्र अधिवेशन !
‘वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे मोठे षड्यंत्र ‘आय.एस्.आय.’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांनी रचल्याचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले आहे. अशा वेळी स्वयंभू हिंदु भूमी असलेल्या भारताला स्वत:ची ओळख पुन्हा मिळवून देणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या माध्यमातून देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित होऊन हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करत आहेत. हिंदु राष्ट्र हे धर्माधिष्ठित असेल; म्हणजे त्याला धर्माचे अधिष्ठान असेल.
यंदा ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे, म्हणजेच ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे १२ वे वर्ष आहे. हे अधिवेशन २४ जून ते ३० जून २०२४ या कालावधीत फोंडा, गोवा येथे श्री रामनाथ देवस्थानातील श्री विद्याधिराज सभागृहात होणार आहे. या अधिवेशनात देश-विदेशांतील १ सहस्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे १ सहस्रहून अधिक प्रतिनिधी, संत, धर्माचार्य, हिंदुत्वनिष्ठ नेते, विचारवंत, लेखक, माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ अधिवक्ते, माजी शासकीय अधिकारी, पत्रकार उपस्थित रहाणार आहेत. या अधिवेशनात हिंदूंच्या रक्षणाचे उपाय, हिंदु राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न, मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय, वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण, देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्या हलाल अर्थव्यवस्थेवर उपाय आदी विषयांवर सांगोपांग चर्चा करून सर्वानुमते कृतीची दिशा सुनिश्चित केली जाईल आणि वर्षभर हिंदत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते त्या दिशेने प्रयत्न करतील. या अधिवेशनाचे हिंदु जनजागृती समितीच्या यू ट्यूब, फेसबुक आणि ‘एक्स’ अकाऊंटवरून, तसेच www.hindujagruti.org या संकेतस्थळावरून थेट (लाईव्ह) प्रक्षेपण करण्यात येणार आहे.’
– श्री. रमेश शिंदे