सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आश्रमाला भेट देऊन जीवनाचे कल्याण करावे !

रामनाथी (गोवा) सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर श्री.आत्माराम कानू कोयंडे यांना जाणवलेली सूत्रे

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. प्रशांत कोयंडे यांची ‘वैष्णवी शांती’ विधी ३.१.२०२५ या दिवशी करण्यात आली. त्या निमित्त त्यांचे मोठे चुलत बंधू श्री. आत्माराम कानू कोयंडे (वय ६४ वर्षे) आश्रमात ४ दिवस निवासासाठी आले होते. या कालावधीत त्यांना आश्रमातील नियोजन, व्यवस्था, वातावरण, साधक आदींविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत. श्री. आत्माराम कोयंडे ‘लार्सन अँड टुब्रो’ या आस्थापनातून निवृत्त झाले आहेत. गेल्या २६ वर्षांपासून ते सद्गुरु वामनराव पै यांच्या ‘जीवन विद्या मिशन’ या संस्थेच्या माध्यमांतून साधना करत आहेत. याअंतर्गत साधनेचा प्रसार करण्याची सेवा ते करत आहेत. यात ठिकठिकाणी प्रवचन करणे, सत्संग घेणे आदी सेवा ते करत आहेत. २१ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘दर्शन परमार्थ सोपानमार्गाचे आणि सनातन आश्रमाला भेट देणे हे दैवी नियोजन’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/875802.html

३. सद्गुरूंच्या पायधुळीचा स्पर्श संपूर्ण आश्रमात अनुभवणे 

श्री.आत्माराम कानू कोयंडे

प्रारंभीच हातपाय धुण्याच्या व्यवस्थेची कल्पकता दिसून आली. प्रशांतने मला रहाण्याची सुविधा दाखवल्यावर क्षणभर वाटले, या जगात मानवाने बनवलेल्या हॉटेलला अधिकाधिक ७ ‘स्टार’ (सप्ततारांकित) मिळालेले आहेत आणि ती केवळ व्यवहार अन् मोल देऊन खरेदी केलेली सोय आहे. मला दिलेल्या निवासस्थानाला मी किती ‘स्टार’ देऊ ?  तेथे असलेल्या ईश्वरी वातावरणाला स्टार देणे मला जमणार नव्हते. सर्व कशी पद्धतशीर व्यवस्था (systematize order). वस्तूला जागा आणि जागेवर वस्तू. आतील रचना वास्तूशास्त्रानुसार, प्रकाश आणि हवा यांचीही योजनापूर्वक व्यवस्था होती. पायाला धुळ म्हणून काही लागलेच नाही; मात्र परमपूज्य सद्गुरूंच्या पायधुळीचा स्पर्श संपूर्ण आश्रमात अनुभवता आला. सर्व कसे जागच्या जागी, तसेच वस्तू ठेवण्याच्या ठिकाणी ‘टॅग’ लावलेले दिसले. केवळ खोलीतच नाही, तर नंतर आश्रम पहातांना सर्वत्रच असे दिसून आले.

४. आश्रमातील वातावरण अतिशय सात्त्विकतेने भारलेले जाणवणे ! 

आश्रमातील वातावरण अतिशय सात्त्विकतेने भरून आणि भारून राहिलेले जाणवले. प्रत्यक्ष परमपूज्य सद्गुरूंचा वास आणि साधकांची तपस्या जेथे चालते तेथे प्रत्यक्ष सद्गुरु इच्छेनुसार वाट्याला आलेली सेवा आवडीने, सेवाभावाने अन् प्रामाणिकपणे, हसतमुखाने करत असतांना साधक दिसले.

५. बाहेरील जगात दुर्मिळ झालेले स्मित हास्य साधकांच्या मुखावर आढळणे 

सर्व साधकांच्या चेहर्‍यावर प्रसन्न असे स्मित हास्य पहायला मिळाले, जे बाहेरील जगात दुर्मिळ झालेले आढळते. मला वाटते आतून बाहेरून पारदर्शक झालेल्या साधकांकडे ते स्वाभाविकपणे येते. कोत्या आणि संकुचित हृदयात परमेश्वर रहात नसतो. त्याला व्यापक आणि विशाल झालेले हृदय वस्ती करायला आवडते. त्याचे लक्षण, म्हणजे चेहर्‍यावरील प्रसन्न हास्य साधकाच्या शुद्धत्वाच्या पायर्‍या चढत गेल्याचे तो एक निकष आहे; कारण ही सर्व साधक मंडळी खर्‍या सद्गुरूंच्या निकट आहेत. सद्गुरु सेवा, साधना, सद्गुरुप्रणीत उपासना करत आहेत. स्वयं संत पुढे देव होण्याच्या मार्गावर आहेत. ‘सद्गुरु हा सत् शिष्याने लावलेला शोध आहे’, असे समर्थ म्हणतात. शिष्यपण तेवढ्याच क्षमतेचा लागतो, हेच खरे.

तें चालतें ज्ञानाचे बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।
येर माणुसपण तें भांब । लौकिक भागु ।। – संत ज्ञानेश्वर

अर्थ : अंतर्मुख होऊन पहातो, शुद्ध आत्मज्ञानाच्या योगाने जो माझे जन्मरहस्य जाणतो, मी आरंभाच्या पलीकडे असूनही सर्व लोकांचा ईश्वर आहे असे जो जाणतो, तो मनुष्याच्या आकारात आलेला माझाच अंश आहे. तो म्हणजे ज्ञानाची चालती मूर्ती आहे. त्याचे अवयव, म्हणजे सुखाला फुटलेले कोंब आहेत. त्याच्या ठिकाणी दिसणारा मनुष्यपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भास आहे. तो शरीरधारी असला, तरी इतरांपेक्षा वेगळा असतो.

६. महाप्रसादाची व्यवस्था आस्थापनांतील सहस्रो लोकांच्या व्यवस्थेपेक्षा काकणभर सरस असणे ! 

साधकांनी सद्गुरु सेवाभावात, स्वयंपाकगृहात बनवलेला महाप्रसाद (जेवण) शुद्ध, सकस, सात्त्विक असेच होते. अनेक अन्नपूर्णा त्यासाठी कष्ट घेतांना दिसल्या. तेथील बेसिनपासून प्रसादाची भांडी विसळून ठेवण्यापर्यंत नियम आणि व्यवस्था पहाण्यासारखी होती. बाहेरच्या आस्थापनात प्रतिदिन ७ सहस्र ५०० माणसे जेवतांनाच्या सुसज्ज व्यवस्थेपेक्षा ही व्यवस्था काकणभर सरस होती.

७. मनोभावे सेवा करणारे साधक दिसणे 

संपूर्ण आश्रम म्हणजे वरपासून खालपर्यंत पाहिला. यातून आश्रमाच्या ‘ए टू झेड’ देखभालीसाठी सुसज्ज व्यवस्था, त्याच प्रकारचे पारंगत असलेले साधक मनोभावे सेवा करतांना दिसले. रात्री प्रशांतने तो करत असलेल्या सेवेचे ठिकाण दाखवले आणि सहसाधकांशी भेट घालून दिली. सुसज्ज अत्याधुनिक स्टुडिओ, ऑडिओ-व्हिडिओ कक्ष, बैठक कक्ष, सभागृह, विविध विभाग दालने पाहिली. मी ध्यानमंदिरात बसून मी करत असलेल्या १०८ प्रार्थना म्हटल्या आणि आरतीलाही उपस्थित राहिलो.

(क्रमश:)

– सद्गुरु चरणरज श्री.आत्माराम कानू कोयंडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (७.१.२०२५)


लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/876564.html