‘पक्षी घरट्यापासून कोणत्याही दिशेने आणि कितीही दूर गेले, तरी ते सायंकाळी घरट्याकडे परत येतात. ‘ही प्रक्रिया कशी घडते ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. यातील काही भाग आपण २१ जानेवारीच्या अंकात पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/875827.html
६ उ. हत्या केल्याने होणारे परिणाम
६ उ १. बालकाचा छळ किंवा हत्या करणे : एखाद्या व्यक्तीने एखाद्या बालकाचा छळ किंवा हत्या केलेली असते. तेव्हा त्या बालकाला झालेली पीडा त्या व्यक्तीला पुढे पक्षी-जन्मात ‘स्वतःची पिल्ले शत्रू-पक्ष्याने खाणे’, या स्वरूपात भोगावी लागू शकते.
६ उ २. हत्या करणार्याला पक्षी-जन्मात होणारे त्रास : पक्ष्याचे स्वतःच्या पिल्लांवर पुष्कळ प्रेम असते. पक्ष्याची पिल्ले अकस्मात् शत्रू-पक्षी खातो. तेव्हा त्या पक्ष्याला पुष्कळ दुःख होते.
६ ऊ. स्वतःच्या अयोग्य वर्तनाने इतरांना विरहाचे दुःख दिल्याने होणारे परिणाम

६ ऊ १. पत्नी किंवा आई-वडील यांना विरहाचे दुःख देणे : जेव्हा पती स्वतःच्या पत्नीला स्वार्थासाठी अकस्मात् सोडून देतो, तेव्हा पत्नीला पतीच्या विरहाचे दुःख भोगावे लागते किंवा जेव्हा मुलगा स्वतःच्या आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना अन्यत्र सोडून देतो, तेव्हा आई-वडिलांना पुत्राच्या विरहाचे दुःख भोगावे लागते. ही पापकर्मे त्या व्यक्तीला पुढे पक्षी-जन्मात ‘स्वतःची पिल्ले शत्रू-पक्ष्याने खाणे’, या स्वरूपात भोगावी लागू शकतात.
६ ऊ २. विरहाचे दुःख देणार्या व्यक्तीला पक्षी-जन्मात होणारे त्रास : अशा पक्ष्याची पिल्ले शत्रू-पक्षी स्वतःच्या चोचीत धरून दूर अंतरावर पळवून नेतो आणि त्यानंतर शत्रू-पक्षी ती पिल्ले खातो. अशा वेळी त्या पक्ष्याला ‘शत्रू-पक्ष्याने पिल्ले कुठे नेली आहेत ? त्यांचे पुढे काय झाले ?’, हे समजत नाही. त्यामुळे तो पक्षी स्वतःच्या पिल्लांच्या विरहाचे दुःख भोगतो.
६ ए. इतरांना लुबाडल्याने होणारे परिणाम
६ ए १. दुसर्याची संपत्ती लुबाडणे : एखाद्या व्यक्तीने अन्य कुणाची भूमी, संपत्ती किंवा घर लुबाडून इतरांना फसवलेले असते. त्याचे पाप त्याला पुढे पक्षी-जन्मात ‘स्वतःचे घरटे वारंवार मोडणे’, या स्वरूपात भोगावे लागू शकते.
६ ए २. दुसर्याची संपत्ती लुबाडणार्या व्यक्तीला पक्षी-जन्मात होणारे त्रास : असा पक्षी पुष्कळ कष्ट घेऊन एखाद्या झाडावर स्वतःचे घरटे सिद्ध करतो. अकस्मात् आलेला पाऊस किंवा वादळी वारा यांमुळे ते घरटे नष्ट होते. अशा प्रसंगी त्या पक्ष्याला दुःख होते आणि तो काही काळाने नवीन घरटे सिद्ध करतो. त्यानंतर थोड्याच कालावधीने नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे घरटे परत मोडते. असे प्रसंग पक्ष्याच्या जीवनात वारंवार घडल्याने त्याला ‘गृहसुख’ लाभत नाही.
६ ऐ. स्वतःच्या अधिकाराचा अपवापर केल्याने होणारे परिणाम
६ ऐ १. पोलीस, न्यायाधीश आणि मालक यांनी केलेले पाप : एखाद्या पोलिसाने कारागृहातील बंदीवानांना विनाकारण छळणे, न्यायाधिशाने त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आरोपीला कारावासाची शिक्षा होणे किंवा मालकाने स्वतःकडे नोकरी करणार्या नोकराचा आयुष्यभर छळ करणे इत्यादी पापकर्मे केलेली असतात. या पापकर्मांचे फळ म्हणून त्या व्यक्तीला पुढे पक्षी-जन्मात ‘पिंजर्यात काही काळ किंवा आयुष्यभर रहावे लागणे’, असा त्रास भोगावा लागू शकतो.
६ ऐ २. स्वतःच्या अधिकाराचा अपवापर केल्याने पक्षी-जन्मात होणारे त्रास : अशा पक्ष्याला काही काळ किंवा आयुष्यभर पिंजर्यात रहावे लागते. त्याला त्याचे सतत दुःख होत असते.
७. मनुष्य-जन्मात केलेली पापे पुढे पक्षी-जन्मात भोगण्याचा त्या जिवाला होणारा लाभ
पक्षी-जन्मात पक्ष्यांना विविध अडचणींना सामोरे जात दुःख भोगावे लागते. त्यामुळे त्यांचे निष्ठूर मन संवेदनशील होते. त्यांना काही काळाने मनुष्य-जन्मात प्रवेश मिळतो. तेव्हा त्या व्यक्तींना इतरांच्या अडचणी आणि त्रास यांची जाणीव होऊ लागते; परिणामी अशा व्यक्ती समाजात वावरतांना स्वतःचे वर्तन चांगले ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.’
‘धर्मशास्त्रानुसार मनुष्याने चांगले कर्म केल्यास त्याला पुण्य मिळते आणि त्याने वाईट कर्म केल्यास त्याला पाप लागते’, याविषयीचे संशोधन अन् अभ्यास करण्यासाठी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाला मिळालेल्या ज्ञानातील हा भाग प्रसिद्ध केला आहे. त्यामागे कोणत्याही व्यक्तीची अपकीर्ती करण्याचा हेतू नाही.’ – संपादक |
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२३) (समाप्त)
|