रूढींना फाटा देणारे पुरोगामी !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘स्वयंसिद्ध महिलांचे हळदी कुंकू’, हा उपक्रम ‘अस्तित्व कला मंच’च्या वतीने विधवा महिलांसाठी आयोजित केला जातो. विधवा महिलांना समाजात सन्मानाने स्थान मिळवून देणे, जुन्या रूढींना फाटा देत नवीन दृष्टीकोन रुजवणे, ही यामागील संस्थेची भूमिका आहे. ‘हिंदु धर्मशास्त्रात अनेक रूढी-परंपरा उद्धृत केल्या आहेत. त्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणांसमवेत वैज्ञानिक कारणेही आहेत; मात्र तथाकथित बुद्धीवाद्यांनी या रूढींना अंधश्रद्धा संबोधून हेटाळणी केली आहे. जो धर्म आपल्याला सर्वार्थाने प्रगती होण्यासाठी काही नियम सांगतो, ते आपल्याला पाळायला हवेत.

कुंकू लावल्याने वैवाहिक जीवन सुखकर होते. पतीमध्ये क्षात्रतेजरूपी ज्योत सतत तेवत ठेवण्यासाठी सुवासिनी स्त्रियांनी कुंकू कपाळावर किंवा भांगात लावण्यास वापर करणे, हे मानसिक आणि आध्यात्मिक या दोन्ही कारणांसाठी योग्य आहे. याउलट ‘विधवा स्त्रीमध्ये वैराग्यभाव लवकर निर्माण होऊन मोक्षप्राप्तीकडे प्रवास व्हावा’, या व्यापक उद्देशाने बाह्यांगाने विधवा स्त्रीसाठी कुंकू, तसेच अलंकार त्याग करण्याची संकल्पना दृढ झाली. हे सूक्ष्म स्तरावरील धर्मशास्त्र ऐकण्याच्या स्थितीत दुर्दैवाने सध्या कुणीही नाहीत. अन्य धर्मीय त्यांच्या प्रथा, परंपरा यांचे पालन करण्यासाठी पुढे सरसावतात; मात्र हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात न घेणारे जन्महिंदू, हिंदु धर्मातील प्रथा- परंपरांच्या विरोधात जात आहेत. पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन पुरो(अधो)गामी विचारसरणीच्या लोकांमध्ये अशा कृती करण्याची प्रथा पडत चालली आहे.

भोगवादी संस्कृतीने ग्रासल्यामुळे पाश्चिमात्य आज भारतीय धर्मग्रंथांत चिरंतन सुखाचा शोध घेत आहेत. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास आध्यात्मिक ऊर्जा आणि उत्साही वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी कुंभमेळ्यात परदेशी भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. कुंभमेळ्यात अमेरिकेतील माजी सैनिकांचाही सहभाग होता. आध्यात्मिक शांती अनुभवण्यासाठी अब्जाधीश लॉरेन पॉवेल जॉब्ज यांनी कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात स्नान केले. हिंदूंच्या सणांचे आध्यात्मिक महत्त्व पाश्चात्त्यांनाही समजू लागल्याने ते त्याचे आचरण करू लागले आहेत. भारतीय बुद्धीवादी आणि पुरोगामी मात्र भारतीय परंपरांना प्रतिगामी समजून त्या धिक्कारत आहेत.

‘अस्तित्व कला मंच’ला स्त्रियांसाठी काही करायचेच असेल, तर त्यांनी समाजात स्त्रियांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. केवळ हिंदु धर्मातील रूढी-परंपरामध्ये पालट करण्याऐवजी अन्य धर्मांतील ‘खतना’, ‘हलाला’, ‘तिहेरी तलाक’, ‘बहुपत्नीत्व’ या प्रथा, तसेच ‘स्त्री ही सैतान आहे’, असे मानणारी विचारसरणी याविषयीही आवाज उठवण्याचे धाडस करावे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे