पाकिस्तानच्या संरक्षण खर्चात १५ टक्के वाढ !

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानने त्याचा १८ लाख ८८ सहस्र कोटी पाकिस्तानी रुपयांचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. भारतीय रुपयानुसार ही रक्कम ५ लाख ६५ सहस्र कोटी रुपये आहे. यामध्ये संरक्षणासाठी मागच्या तरतुदीच्या तुलनेत १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तान संरक्षणावर १ सहस्र ८०४ अब्ज रुपये खर्च करत होता; पण या वेळी तो २ सहस्र १२२ अब्ज रुपये खर्च करणार आहे.

अर्थमंत्री महंमद औरंगजेब यांनी पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. सरकारचा अंदाज आहे की, पाकिस्तानचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ३.६ टक्के दराने वाढेल. गेल्या वर्षी पाकिस्तानने ३.५ टक्के विकास दर निश्‍चित केला होता; परंतु हा दर गाठण्यात त्यांना यश आले नाही. पाकिस्तानचा विकास दर २.३८ होता. महागाई १२ टक्क्यांपेक्षा अधिक असण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे.

सरकारी उद्योग खासगी क्षेत्राकडे सोपवणार !

अर्थमंत्री औरंगजेब यांनी संसदेत सांगितले की, सरकार उद्योगांचे खासगीकरण करण्याची सिद्धता करत आहे. सरकारचे काम व्यवसाय करणे नाही. सरकारने किमान वेतन ३२ सहस्र रुपयांवरून ३६ सहस्र रुपये केले आहे. या पावलामुळे नोकरदार वर्गाला दिलासा मिळणार आहे. सरकारने सरकारी कर्मचार्‍यांचाही विचार केला असून त्यांच्या पगारात २० ते २५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • जनतेला खाण्यासाठी अन्न मिळणे कठीण झाले असतांनाही पाकचे सरकार सैन्यावरील खर्चात मात्र वाढ करते आणि तेथील जनता ते स्वीकारते. यावरून पाकची मानसिकता लक्षात येते !