चीनमध्ये कोरोनाचे सत्य वार्तांकन केलेल्या महिला पत्रकाराची ४ वर्षांनी कारागृहातून सुटका !

  • कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहान शहराचे अनेक व्हिडिओ केले होते प्रसारित !

  • मृत्यूविषयी सरकारची आकडेवारी चुकीची असल्याचेही केले होते उघड !

बीजिंग (चीन) – चीनने कोरोना महामारी कशा प्रकारे अमानुषपणे हाताळली, याचा भांडाफोड करणार्‍या महिला पत्रकार झांग जेन यांची ४ वर्षांनंतर सुटका करण्यात आली आहे. १३ मे या दिवशी त्यांना सोडण्यात आले; परंतु त्याची माहिती नुकतीच त्यांनी स्वत: प्रसारित केलेल्या व्हिडिओतून समोर आली आहे. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या वुहान शहरात कोरोनाचे सत्य वार्तांकन केल्यावरून झांग यांना अटक करण्यात आली होती. झांग यांना हिंसाचार भडकावल्याचे कारण देत अटक करण्यात आली होती.

झांग जेन या अशा चिनी पत्रकारांपैकी एक आहेत, ज्यांनी वुहानचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित केले होते. या व्हिडिओजमध्ये वुहानमधील रुग्णालयांमधील रुग्णांची भयावह स्थिती दाखवण्यात आली होती. त्या म्हणाल्या होत्या की, ‘येथील स्थिती इतकी बिकट आहे की, जणू वुहान शहराला अर्धांगवायू झाला आहे. जर आपण लोकांना याविषयी माहिती दिली नाही, तर जगाला कळणार नाही की, येथे काय चालले आहे.’

कोरोना महामारीचा आरंभीचा घटनाक्रम !

८ डिसेंबर २०१९ : कोरोनाचा पहिला रुग्ण वुहान शहरात आढळून आला. तेव्हा त्या आजाराकडे ‘न्यूमोनिया’ म्हणून पाहिले जात होते.

डिसेंबर २०१९ चा उत्तरार्ध : डॉ. ली वेनलियांग यांनी वुहानमधील रुग्णालयात ‘कोरोना विषाणू’चे प्रथमच वर्णन केल; पण चीन सरकारने ली यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांच्यावर अफवा पसरवल्याचा आरोपही केला. नंतर ली यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला.

३१ डिसेंबर २०१९ : चीनमध्ये कोरोनाची अचानक २७ प्रकरणे समोर आली. त्यानंतर त्यांनी ‘जागतिक आरोग्य संघटने’ला कोरोनाविषयी सतर्क केले.

२३ जानेवारी २०२० : वुहानमध्ये दळणवळण बंदी लागू करण्यात आली. त्या वेळी चीनबाहेर केवळ ९ प्रकरणे होती. तेव्हा या विषाणूला ‘कोविड-१९’ असे नाव देण्यात आले.

फेब्रुवारी २०२० : झांग यांनी रहाते शहर शांघाय शहरातून वुहान गाठले. त्यांनी बनवलेले व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोचले.

११ मार्च २०२० : जागतिक आरोग्य संघटनेने ने याला महामारी घोषित केले.

मे २०२० : झांग यांना सरकारी अधिकार्‍यांकडून धमक्या मिळू लागल्या. त्यानंतर त्या अचानक गायब झाल्या.

डिसेंबर २०२० : झांग कोठडीत असल्याचे उघड झाले.