पुणे येथील कार अपघाताचे प्रकरण !

पुणे – येथे दारूच्या नशेत गाडी चालवून २ जणांचा जीव घेणार्या वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबियांचे छोटा राजनसमवेत संबंध असल्याचे उघड झाले आहे. वेदांत अग्रवालची हमी देण्यासाठी आलेले त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांचे थेट छोटा राजनशी संबंध आहेत. वर्ष २००७-०८ या कालावधीतील एक प्रकरण समोर आले आहे. मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजनशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यामध्ये सुरेंद्र अग्रवाल यांचे प्रकरण असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनचा हस्तक असलेल्या विजय तांबट याची बँकॉक येथे जाऊन भेट घेतली होती.
भावांसमवेत असलेल्या संपत्तीच्या वादात वेदांत अग्रवालच्या आजोबांनी छोटा राजनचे साहाय्य घेतले होते. या प्रकरणी अजय भोसले नावाच्या व्यक्तीच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे; मात्र या प्रकरणात मकोका कायदा लावणे अपेक्षित असतांनाही पुणे पोलिसांनी केवळ भारतीय दंडसंहितेनुसार कलमे लावून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आरोपपत्र प्रविष्ट करेपर्यंत सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना अटक झाली नव्हती.