विदेशी दूतावासांत स्फोट घडवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या फरार आतंकवाद्याला अटक !

बेंगळुरू – चेन्नई येथील अमेरिकेचे दूतावास अन् बेंगळुरू येथील इस्रायलचे दूतावास येथे स्फोट घडवून आणण्याचे षड्यंत्र रचणार्‍या नुरुद्दीन उपाख्य रफी या आतंकवाद्याला ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’च्या (‘एन्.आय.ए.’च्या) अधिकार्‍यांनी म्हैसुरू येथे नुकतीच पुन्हा अटक केली.

नुरुद्दिनची सशर्त जामिनावर सुटका झाली होती; परंतु नंतर तो बेपत्ता झाला होता. चेन्नई न्यायालयाने नुरुद्दिनला पसार अपराधी घोषित केले होते. आरोपी म्हैसुरूतील राजूनगर येथे लपून बसल्याची माहिती ‘एन्.आय.ए.’च्या अधिकार्‍यांना मिळाली. अधिकार्‍यांनी धाड घालून आरोपीला अटक केले.

नुरुद्दीन

आरोपी नुरुद्दीनने पाकिस्तानतील अमीर सिद्दिकी आणि श्रीलंकेतील महंमद यांच्या साहाय्याने चेन्नई येथील अमेरिकेचे दूतावास अन् बेंगळुरू येथील इस्रायलचे दूतावास येथे स्फोट घडवण्याचे षड्यंत्र वर्ष २०१४ मध्ये रचले होते. या प्रकरणात नुरुद्दीनला अटक झाली होती आणि त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता. त्याला वर्ष २०२३ मध्ये सशर्त जामीन संमत करण्यात आला. नंतर तो पसार झाला होता. या पार्श्‍वभूमीवर त्याचा सुगावा सांगणार्‍यांना ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. (अशा गुन्हेगारांना देशद्रोहाच्या कायद्याखाली तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून असे गुन्हे करण्यास कुणीही धजावणार नाही ! – संपादक)