चारधाममध्ये ३१ मेपर्यंत ‘व्हीआयपी’ दर्शन नाही !

उत्तराखंड सरकारचा आदेश !

डेहराडून – चारधाम यात्रेसाठी केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री येथे भाविकांची होणारी प्रचंड गर्दी, हे प्रशासनासमोरील आव्हान बनले आहे. प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी अतीमहनीय व्यक्तींच्या (‘व्हीआयपी’च्या) दर्शनावरील बंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही बंदी २५ मेपर्यंत लागू करण्यात आली होती.  याखेरीज प्रशासनाने मंदिराच्या ५० मीटर परिसरात भाविकांना ‘रील्स’ आणि ‘व्हिडिओ’ बनवता येणार नसल्याचे म्हटले आहे.

१. यमुनोत्री आणि गंगोत्री या मार्गांवरील वाहतूक कोंडीवर कोणताही तोडगा निघालेला नाही.

२. उत्तरकाशी ते गंगोत्री या ९९ किमी मार्गावर आणि बरकोट ते यमुनोत्री या ४६ किमी मार्गावर ३ सहस्र वाहने १२ तास रहदारीत रांगेत असल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे.

३. प्रशासनाने गंगोत्री आणि यमुनोत्री या मार्गांवरील अनेक अडथळे दूर केले आहेत.

४. १६ मे या दिवशी केदारनाथ येथे २८ सहस्र, बद्रीनाथ येथे १२ सहस्र, यमुनोत्री येथे १० सहस्र ७१८ आणि गंगोत्री येथे १२ सहस्र २३६ भाविकांनी दर्शन घेतले. आतापर्यंत एकूण ३ लाख ९८ सहस्र लोकांनी चारही धामांना भेटी दिल्या आहेत. २८ लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

५. वाहतूक कोंडीमुळे भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उत्तरकाशी प्रशासनाने अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या यांचे वाटप केले. काही तात्पुरती स्वच्छतागृहेही उभारण्यात आली आहेत.

६. चारधाम यात्रेच्या मार्गावर प्रथमच ४०० हून अधिक डॉक्टर्स नियुक्त करण्यात आले आहेत.