आपले यश हे भगवंताच्या कृपेचे फळ समजावे !

पू. (प्रा.) के.वि. बेलसरे

एक मोठे तुरुंगाधिकारी होते. ते त्यांच्या कर्तबगारीची मोठी बढाई लोकांसमोर मारत. श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज यांना) एकदा ते भेटले. ‘आपला व्यवसाय काय ?’, असे विचारताच त्यांनी त्यांच्या अधिकारांचे मोठेपण आणि त्यांचे कर्तृत्व सांगितले. श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘तुमच्या तुरुंगामध्ये बरेच कैदी असतात. वेगवेगळे गुन्हे केल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या मुदतीच्या शिक्षा झालेल्या असतात. एका कैद्याने चोरी आणि घरफोडी केली होती. त्याविषयी त्यास ३ वर्षे सक्तमजुरी झाली होती; पण शिक्षेच्या काळात त्याने त्याचे वर्तन चांगले ठेवले. सुटून आल्यावर तो लोकांमध्ये बढाई मारू लागला की, ३ वर्षांच्या तुरुंगातील काळात आपण कुणाकडून एक पै म्हणून घेतली नाही. त्याने मारलेली अशी बढाई कितपत शोभून दिसेल ? ती निश्चित हास्यास्पद ठरेल. हे जसे खरे तसे, जन्मास येणे, हा एक प्रकारचा कारागृहवासच आहे. त्याच्यात ‘मी असा मोठा आणि कर्तबगार आहे’, असे म्हणणे, हे त्या कैद्याने बढाई मारल्यासारखेच नाही का होणार ? ‘सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे’, अशी जाणीव ठेवून त्याविषयी रामाचे उतराई होण्यातच मनुष्यदेहाचा खरा पुरुषार्थ आहे, असे मला वाटते.’

संकलक : ल.ग. मराठे (श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलकर महाराज यांच्या हृद्द आठवणी)

(‘पू. (प्रा.) के.वि. बेलसरे यांचे आध्यात्मिक सामर्थ्य’ या फेसबुकवरून साभार)