डेहराडून (उत्तराखंड) – उन्हाळा जसजसा शिगेला पोचत आहे, तसतसे उत्तराखंडच्या जंगलातील आगीचे प्रमाणही तीव्र होत आहे. जंगलातील आगीमुळे काळे ढग निर्माण झाले आहेत. या काळ्या कार्बनमुळे पर्यावरण संकटात आले आहे. लोकांना श्वास घेण्यासारख्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आगीच्या घटनांमध्ये उत्तराखंड अग्रेसर !
जंगलातील आगीच्या घटनांमध्ये उत्तराखंड अग्रेसर आहे. ७ दिवसांमध्ये उत्तराखंडमध्ये ४ सहस्र ५०० पेक्षा अधिख ‘फायर अलर्ट’ (आग भडकण्याआधी पाठवण्यात येणारे सिग्नल) पाठवण्यात आले आहेत. या कालावधीत उत्तराखंडमध्ये जंगलातील आगीच्या सर्वाधिक ३५० गंभीर घटनांची नोंद झाली आहे.
कार्बनच्या निर्मितीमध्ये जंगलातील आगीचा मोठा वाटा आहे, हे एक वैज्ञानिक सत्य आहे. जेव्हा जंगले जळतात, तेव्हा ते मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आणि ब्लॅक कार्बन यांसह इतर प्रदूषकही उत्सर्जित करतात. अर्धा जळलेला कार्बन म्हणजे काळा कार्बन. यामुळे हवेची गुणवत्ता आणि हवामान यांवर विपरीत परिणाम होतो.