संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेचा दावा
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेने तिच्या चेतावणीमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे रुग्णालयात भरती झालेल्या एकूण रुग्णांपैकी केवळ ८ टक्के रुग्णांना जिवाणूमुळे संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यावर प्रतिजैविकांद्वारे उपचार केले जाऊ शकतात; परंतु प्रत्येक ४ रुग्णांपैकी ३ रुग्णांना कोणतीही विशेष आवश्यकता नसतांना औषध देण्यात आले.
१. व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर परजीवी कालांतराने प्रतिजैविक प्रतिकार विकसित करतात. अशा परिस्थितीत प्रतिजैविक आणि इतर जीवनरक्षक औषधे अनेक प्रकारच्या संक्रमणांवर परिणाम करू शकत नाहीत. सर्व प्रकारच्या प्रतिजैविकांना प्रतिरोधक बनलेल्या ‘सुपरबग्स’ या जिवाणूंचा उदय आणि प्रसार रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर करणे महत्त्वाचे आहे.
२. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रवक्त्या डॉ. मार्गारेट हॅरिस यांनी सांगितले की, जागतिक महामारीच्या काळात आरोग्य संघटनेने कोविड-१९ उपचारांसाठी प्रतिजैविकांचा वापर करण्याची शिफारस केली नव्हती. ‘हा व्हायरस आहे’, असा सल्ला आरंभीपासूनच स्पष्टपणे देण्यात आला होता. त्यामुळे आरोग्य कर्मचार्यांनी त्या दिशेने उपाययोजना काढावी, अशी कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे किंवा कोणतीही शिफारस केली नव्हती; पण कदाचित् लोक पूर्णपणे नवीन गोष्टीचा सामना करत असल्याने त्यांना योग्य वाटेल, असा उपाय त्यांनी शोधला असावा.
३. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, प्रतिजैविकांच्या वापरामुळे कोविड-१९ संक्रमित लोकांच्या स्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा दिसून आली नाही. त्याऐवजी, त्यांना अशी औषधे दिली गेली, ज्यांना जिवाणू संसर्ग नसलेल्या लोकांना हानी पोचू शकते; परंतु तरीही त्यांना औषधे दिली गेली.
४. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य तज्ञांनी यावर जोर दिला की, सध्याचे निष्कर्ष असे दर्शवतात की, रुग्ण आणि लोकसंख्या यांवर नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर तर्कसंगत असणे आवश्यक आहे.