‘३१.३.२०२२ या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने विशेष भक्तीसत्संग होता. मला या सत्संगात गुरुकृपेने श्रीरामतत्त्वाची अनुभूती घेता आली.
१. भक्तीसत्संग चालू होण्यापूर्वी मला वातावरणात गारवा जाणवला. ‘वातावरणात आनंदाची स्पंदने कार्यरत आहेत’, असे मला जाणवत होते. माझ्या मनात भक्तीसत्संगाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भक्तीसत्संगात बोलत होत्या. त्यांची वाणी, म्हणजे दिव्य लोकातील स्वर असून ‘प्रत्यक्ष सरस्वतीदेवी हा सत्संग आम्हाला देत आहे’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ज्या वेळी सांगितले, ‘‘आपण त्रेतायुगात आहोत’’, त्या क्षणी मला सूक्ष्मातून प्रत्यक्ष गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) समोर दिसले. ‘भक्तीसत्संग त्रेतायुगात होत आहे’, असे मला अनुभवता आले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी रामावतार आणि अयोध्या यांचे वर्णन केले. त्या वेळी ‘ते युग म्हणजे श्रीराम, म्हणजेच गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) राम रूपात अवतीर्ण झाले’, असे मला अनुभवायला आले.
५. भक्तीसत्संगात ‘आपण रामाच्या महालात आहोत’, असे सांगितले. तेव्हा मला भूमीचा स्पर्श मऊ आणि उबदार जाणवला. मला सूक्ष्मातून दिसले, ‘महालात मी दासी म्हणून सेवा करत आहे.’
६. मी सर्व प्रसंग ‘याची देही, याची डोळा’ अनुभवत आहे’, असे मला वाटले. वातावरणातील आनंदाची स्पंदने ग्रहण करण्यासाठी माझ्या शरिरातील प्रत्येक पेशी उत्सुक होती. आनंद माझ्या देहात भरून होता. मला झालेला आनंद भावाश्रूंच्या माध्यमातून व्यक्त होत होता. मला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नव्हती.
७. ‘भक्तीसत्संगाची समाप्ती होऊ नये. श्रीसत्शिक्त (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाणीतून निरंतर सत्संग चालू रहावा’, असे मला वाटत होते.
८. भक्तीसत्संग झाल्यावर मला वाटले, ‘आज माझे मंगल झाले.’ मला ‘कुणाला तरी आनंदाने आलिंगन द्यावे’, असे वाटले. मी साधिका सुश्री (कु.) होमिओपॅथी वैद्या आरती तिवारी यांना आलिंगन दिले.
मी अनुभवलेले बुद्धीच्या पलीकडचे आहे. खरेतर हे लिहिण्याची माझी पात्रता नाही. गुरुदेवांच्या कृपेने मी ही सूत्रे लिहू शकले. मला हे सर्व अनुभवायला दिले, त्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०२२)
|