सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील शिवाच्या चित्रातील त्याच्या चेहर्‍याच्या मागे असलेली प्रभावळ पहातांना साधकाला आलेली अनुभूती 

‘एकदा मी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत गेलो असतांना त्यांच्या देवघरातील ‘प्रत्येक देवतेचे चित्र आणि त्या देवतेच्या चित्रात तिच्या चेहर्‍याभोवती असलेली प्रभावळ’ यांच्याकडे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग केला.  

१. शिवाच्या चित्रातील चेहर्‍याच्या मागे असलेली फिकट निळसर रंगाची प्रभावळ पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती : माझे निरीक्षण चालू असतांना प.पू. डॉक्टरांनी मला शिवाच्या चित्रातील त्याच्या चेहर्‍याच्या मागे असलेली फिकट निळसर रंगाची प्रभावळ पहायला सांगितली. मी ते पहात असतांना ‘त्या प्रभावळीच्या निळसर रंगात जणू एक डोह आहे. तो डोह नीरव आणि प्रगाढ शांततेचा, नितळ निळ्या रंगाचा, असीम आनंदाचा आहे. हा केवळ आनंदाचा आणि स्थिरतेचा अनुभव घेण्यासारखा आहे. तो डोह शांतस्वरूप आहे. त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाही’, असे काहीसे मला जाणवले. त्याचे शब्दांत वर्णन करता येण्यासारखे नाही. तो रंग म्हणजेच तो डोह. ‘त्यात उडी मारून सामावून जावे. त्याचा आनंद घेत राहावा. त्यात स्थिर होऊन विरून जावे’, असे मला वाटत होते.

२. त्यानंतर मी नामजप करत असतांना मला त्या डोहाचे स्मरण झाले. मला वाटू लागले, ‘असे काही ध्यान लागावे की, त्या डोहात असणार्‍या त्या नीरव शांततेत, त्या असीम आनंदाच्या कणांमध्ये विरघळून जावे. माझे अस्तित्वच राहू नये.’

मला या दिव्य अनुभूती अनुभवायला देणार्‍या गुरुदेवांच्या चरणी मी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक