डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
पुणे – अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक संशयित अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे) अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग यांच्या विरोधात ‘सिंग यांनी शपथेवर न्यायालयात खोटी माहिती दिली. त्यामुळे सिंग यांना शिक्षा व्हावी’, यासाठी आवेदन (याचिका) प्रविष्ट केले. त्यामुळे या याचिकेच्या संदर्भात एस्.आर्. सिंग स्वत: ८ एप्रिल या दिवशी न्यायालयात उपस्थित राहिले आणि त्यांनी या संदर्भात उत्तर देण्यासाठी मुदत मागून घेतली. त्यावर न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. गेल्या काही सुनावण्यांमध्ये बचाव पक्षाच्या वतीने जो युक्तीवाद केला आहे, त्यावर तोंडी युक्तीवाद न करता सरकार पक्षाच्या वतीने लेखी युक्तीवाद न्यायालयात सादर करण्यात आला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू आहे. या वेळी सीबीआयचे विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे उपस्थित होते, तर संशयितांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड उपस्थित होत्या. या प्रकरणातील पुढील सुनावणी १८ एप्रिल २०२४ या दिवशी होणार आहे.