संपादकीय : द्रमुकचा वैचारिक आतंकवाद !

खासदार ए. राजा

द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी, ‘माझा राम आणि रामायण यांच्यावर विश्वास नाही, आम्ही रामाचे शत्रू आहोत’, असे विधान केले आहे. हे तेच ए. राजा आहेत, ज्यांनी काही वर्षांपूर्वी स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी केली होती. द्रमुकवाल्यांचा हिंदुद्वेष नवा नाही. अलीकडेच द्रमुकच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांच्याशी करून धर्म संपवण्याची भाषा केली होती. द्रमुकवाले हे पेरियारवादी आहेत. पेरियार यांनी समाज सुधारण्याच्या नावाखाली हिंदु धर्माला लक्ष्य केले. ‘हिंदु धर्मात असलेल्या अनेक समाजविरोधी रूढी-परंपरांमुळे समाजातील विशिष्ट वर्ग मागास राहिला’, असे त्यांचे मत ! त्यांच्या या विचारांमुळे तमिळी जनतेमध्ये ब्राह्मणद्वेष आणि हिंदुद्वेष भिनला. पेरियार यांनी द्रविडीवाद उदयास आणला. त्यांच्या मते, श्रीराम हा आर्य, तर रावण हा द्रविड ! त्यामुळे ‘रामाचा द्वेष करून रावणाची पूजा करा’, असा प्रसार त्यांनी समाजात केला. पेरियार यांच्या विखारी विचारांचा तेथील समाजावर इतका वाईट परिणाम झाला की, तेथे ‘श्रीरामाच्या प्रतिमेला जोड्याने मारा’, यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागले. त्याला नगण्य विरोध झाला.

राजा किंवा उदयनिधी स्टॅलिन यांच्या हिंदुद्वेषी वक्तव्यांमागील ही पार्श्वभूमी हिंदूंनी लक्षात घ्यायला हवी. मागील कित्येक दशके तमिळनाडूमध्ये अशी विखारी विचारसरणी फोफावत असतांना अशांना म्हणावा तसा विरोध जनतेकडून झाला नाही. त्यामुळे द्रमुकवाल्यांचा उद्दामपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ‘समाजाचा उत्कर्ष व्हायला हवा’ किंवा ‘समाजातील वाईट किंवा समाजघातक परंपरा नष्ट व्हायला हव्यात’, असे सर्वांनाच वाटते; मात्र ही सुधारणा करण्यासाठी पत्करलेला मार्ग हा हिंदुद्वेष असू शकत नाही. द्रमुकवाल्यांनी राजकीय स्वार्थासाठी ब्रिटिशांप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’, ही नीती अवलंबली. द्रमुकने समाजातील पीडित वर्गाला ‘तुमच्या वाईट स्थितीला ब्राह्मण आणि उच्चवर्णीय कारणीभूत आहेत’, असा दुष्प्रचार केला. त्याचा परिणाम म्हणजे समाजात जाती-जातींमध्ये विष कालवले गेले. हिंदु धर्म, देवता आणि धर्मग्रंथ यांविषयी अपप्रचार केल्यामुळे तेथील एका विशिष्ट वर्गातील लोकांमध्ये हिंदु धर्माविषयी घृणा निर्माण झाली. याचा राजकीय लाभ द्रमुकला झाला. त्याला सत्तेची फळे चाखता आली; मात्र या समाजाचा वैचारिक विकास खुंटला. तेथील समाजात समरसता निर्माण झाली नाही. आताही हिंदु धर्मावर टीका करणारे द्रमुकवाले तेथील ख्रिस्ती धर्मप्रचारकांना मात्र पायघड्या घालत आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रविघातक आणि समाजविघातक घटकांच्या कारवाया वाढल्या आहेत. हे रोखायचे असेल, तर तमिळी समाजामध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. द्रमुकच्या नेत्यांनी केलेले वैचारिक प्रदूषण रोखण्यासाठी तेथील समाजात वैचारिक संपन्नता आणावी लागेल. हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता आणि धर्मग्रंथ यांचे महत्त्व तेथील जनतेच्या मनावर बिंबवावे लागेल. ‘पेरियारवादी विचारांनी समाजाची काय हानी केली ?’, हे तेथील जनतेच्या लक्षात आल्यावर जनताच द्रमुकचे राजकीय अस्तित्व संपवेल. ही प्रक्रिया सोपी आणि सुलभ निश्चित नाही. प्रखर हिंदुत्वनिष्ठांचा मोठा गट तेथे कार्यरत करावा लागेल. यासाठी भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी यात लक्ष घालावे लागेल. राजा काय किंवा उदयनिधी, त्यांनी केलेल्या हिंदुद्वेषी वक्तव्यांनंतर तमिळनाडूत किती प्रमाणात त्याचे वैचारिक पडसाद उमटले ? समाजातील प्रत्येक घटकाने याचा विविध माध्यमांतून वैध मार्गाने विरोध केल्यास द्रमुकवाले वठणीवर येतील. ‘रामावर ज्याचा विश्वास नाही, त्याच्यावर आमचाही विश्वास नाही’, असे हिंदूंनी द्रमुकवाल्यांना ठणकावून सांगितले आणि मतपेटीद्वारे दाखवूनही दिले, तरच द्रमुकवाल्यांना त्यांची जागा लक्षात येईल.

द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !