|
श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने ‘इन्सॅट-३ डी.एस्.’ नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून १७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ५.३५ वाजता याचे प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी ‘इस्रो’चे अध्यक्ष एस्. सोमनाथ यांनी याआधी आंध्रप्रदेशात असलेल्या सुल्लुरपेट येथील श्री चेंगलम्मा मंदिरात पूजा केली. हवामान आणि नैसर्गिक आपत्ती यांची अचूक माहिती मिळावी, हा या उपग्रहाचा उद्देश आहे. यासंदर्भात सोमनाथ म्हणाले की, हे उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठी सिद्ध करण्यात आले आहे. उपग्रहांच्या ‘इन्सॅट’ मालिकेतील हे तिसरा उपग्रह आहे.
हवामानाची अचूक माहिती मिळेल !
या मोहिमेचा संपूर्ण निधी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने उपलब्ध केला आहे. हे प्रक्षेपण अंतराळ क्षेत्रात भारताच्या वाढत्या वर्चस्वाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘इन्सॅट-३ डी.एस्.’ उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल. यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल. यातून मानवाला नैसर्गिक आपत्तींविषयी अधिक चांगले अंदाज बांधता येतील. भारतीय हवामान संस्थांसाठी हे उपग्रह अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
संपादकीय भूमिकाईश्वरी अधिष्ठानाचे महत्त्व जाणणारे ‘इस्रो’चे अध्यक्ष ! |