रत्नागिरी जिल्ह्यातील ४३ पतसंस्था अवसायनात !

रत्नागिरी – पतसंस्था अवसायनात (अवसायनात म्हणजे दिवाळखोरी) निघाली, तर सर्वसामान्यांची आर्थिक हानी होते. ही हानी टाळण्यासाठी ‘पतसंस्थांचे कडक लेखापरीक्षण करावे आणि गैरव्यवहार आढळल्यास कडक कारवाई करावी’, असे निर्देश सहकार विभागाने दिलेले आहेत. या निर्देशांनुसार सहकार विभागाकडून केलेल्या लेखापरीक्षणानंतर रत्नागिरी जिल्ह्यात वर्ष २०१२ ते २०२३ या कालावधीत ४३ पतसंस्थांचा कारभार अवसायनात (दिवाळखोरीत) काढण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा साहाय्यक उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिल्याचे वृत्त ‘रत्नागिरी खबरदार’ या वृत्तसंकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.

ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत, त्यांची तपासणी केली जात असते. जेणेकरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही केली जाते. सहकार विभागाने कामकाज बंद असलेल्या संस्थांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील विविध प्रकारांतील संस्थांच्या सर्वेक्षणानंतर संबंधित पतसंस्थांना अंतरिम नोटीस बजावली जाते.
त्यानंतर ती पतसंस्था अवसायनात काढण्याची कार्यवाही साहाय्यक उपनिबंधक कार्यालयाकडून केली जाते. शासनाकडून वर्ष २०१४ पासून सहकार शुद्धीकरणाची मोहीम हातात घेण्यात येऊन राज्यातील सहस्रो संस्था अवसायनात निघाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने वेळोवेळी ही सहकार शुद्धीकरण मोहीम हातात घेतली आहे.

सहकार विभागाने पतसंस्था सर्वेक्षणाचे आदेश जिल्हा निबंधक कार्यालयाला दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या संस्थांच्या सर्वेक्षणात त्यांची जागेवर जाऊन माहिती घेण्यात आली. यामध्ये संबंधित संस्थांना अंतरिम नोटिसा काढण्यात येऊन अवसायनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. तसा अहवाल सहकार विभागाकडे पाठवण्याची कार्यवाही केली जाते.

बिगरशेती पतसंस्था सर्वाधिक

रत्नागिरी जिल्ह्यातील कारभार अवसायनात काढण्यात आलेल्या संस्थांमध्ये २९ बिगरशेती सहकारी पतसंस्था, ८ नागरी सहकारी पतसंस्था, ४ सेवक सहकारी आणि १ संचयकार सहकारी पतसंस्थांचा समावेश आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात २, दापोली ६, खेड १, चिपळूण १०, गुहागर ४, संगमेश्वर ५, रत्नागिरी ८, लांजा ४ आणि राजापूर तालुक्यात ३ सहकारी पतसंस्थांचा समावेश आहे.