वाराणसी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमध्ये हलाल प्रमाणपत्र देणार्या आस्थापनांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासनाने मोठा झटका दिला आहे. यांतर्गत हलाल प्रमाणपत्रासह विकल्या जाणार्या सर्व खाद्यपदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाचे संत समितीने स्वागत केले आहे.
अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी या आदेशाचे स्वागत करतांना प्रमाणपत्र देणार्या हलाल ट्रस्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तरप्रदेशात हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली आतंकवाद्यांना निधी पुरवला जात होता, असा संशय संत समितीने व्यक्त केला आहे.
वाराणसी प्रशासनाने २० दुकानांवर घातल्या धाडी !हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आल्याने ‘वाराणसी खाद्य सुरक्षा आणि औषध प्रशासना’ने २० हून अधिक दुकानांवर धाडी घातल्या. यांपैकी ४ दुकानांमध्ये हलाल प्रमाणित उत्पादने सापडली. सरकारी अधिकार्यांनी ती तातडीने हटवली असून दुकानदारांना अशी उत्पादने यापुढे ठेवता कामा नये, अशी चेतावणीही दिली. शासनाने हलाल प्रमाणीकरण असलेल्या ४१ उत्पादनांना चिन्हित केले असून त्यांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. |