आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने आदेश कायम ठेवला !
अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती बनलेल्या ‘श्री ब्रह्मारंभ मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम्’च्या एका कर्मचार्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा आदेश कायम ठेवला आहे. न्यायालयाने म्हटले की, ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे हा कर्मचारी आता हिंदु राहिलेला नसल्याने धार्मिक संस्थान अधिनियमानुसार तो कामावर राहू शकत नाही. या अधिनियमानुसार या मंदिरात केवळ हिंदु व्यक्तीच कामावर राहू शकते.
१. वर्ष २००२ मध्ये या कर्मचार्याला अनुकंपेच्या आधारे मंदिरात कामाला ठेवण्यात आले होते. त्याने वर्ष २०१० मध्ये ख्रिस्ती तरुणीशी एका चर्चमध्ये विवाह केला होता. यानंतर त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. ‘त्याने नोकरी मिळण्याच्या वेळी स्वतःचा ख्रिस्ती धर्म लपवला’, असे तक्रारीत म्हटले होते. यानंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्याने स्पष्टीकरण देतांना म्हटले होते, ‘मी धर्म लपवला नव्हता. मी या संदर्भातील सरकारी कादगपत्रे सादर केली होती आणि मी अनुसूचित जातीतील असल्याची माहिती दिली होती. ‘ख्रिस्ती तरुणीशी विवाह केल्यावर मी धर्मांतर केले’, असे समजले जाऊ नये. मी आताही हिंदु धर्मालाच मानतो.’ उच्च न्यायालयाने त्याचे स्पष्टीकरण फेटाळत त्याला नोकरीवरून काढण्याचा मंदिर समितीचा आदेश कायम ठेवला.
२. न्यायालयाने निकालाच्या वेळी म्हटले की, जर याचिकाकर्त्याने ख्रिस्ती धर्म न स्वीकारता ख्रिस्ती तरुणीशी विवाह केला असेल, तर ‘विशेष विवाह अधिनियम, १९५४’च्या तरतुदींनुसार हा विवाह करायला हवा होता. विवाह प्रमाणपत्र हे ‘विशेष विवाह अधिनियमा’च्या कलम १३ अनुसार दिले पाहिजे होते; मात्र याचिकाकर्त्याने आतापर्यंत कलम १३ अंतर्गत कोणतेही प्रमाणपत्र सादर केले नाही. यातून लक्षात येते की, याचिकाकर्त्याने या नियमातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ही याचिका प्रविष्ट केली. ज्या नांदयालमधील चर्चमध्ये विवाह करण्यात आला, तेथील नोंदीमध्ये याचिकाकर्ता आणि त्याची पत्नी यांचा धर्म ‘ख्रिस्ती’ असाच लिहिण्यात आला असून त्यावर तेथील रजिस्ट्रारची स्वाक्षरीही आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरात हिंदूच काम करणारे हवेत, याला कुणीच विरोध करणार नाही ! |